रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला, तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळिला
सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- २८ जुलै १९७०, नागपूर. |
झार | - | दर्दभरेपण. |
मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोट्या मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..
''कुणी जाल का.. सांगाल का..
सुचवाल का त्या कोकिळा..
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा..
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली !''
सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..'
महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
(संपादित)
सौजन्य- दै. लोकसत्ता (२८ एप्रिल, २०१४)
(Referenced page was accessed on 20 May 2015)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
१९ सप्टेंबर १९७८
'दाद'- कोकिळेला कंठ नसतो. 'कोकिळ' म्हणजे नर हाच गात असतो. ह्या सत्याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच असते. मी मात्र 'कोकिळ' हाच शब्द 'हिवाळा' कवितेत आणि इथेही योजिला आहे… 'संध्याकाळची बरसात'- इथे आसवे डोळ्यांत आणणारी संध्याकाळ- संध्याकाळी डोळ्यांत येणारे अश्रू. 'काळोख मी कुरवाळला'- म्हणजे ही व्यथासुद्धा मी आपुलकीने सहन केली. जीवाला कसेबसे सांभाळून घेतले. नीजही हलक्या पावलाने येणार होती. पण ह्या कोकिळाच्या गाण्यातली 'झार' (दर्दभरेपणा) रात्री फारच वाढत जाते. म्हणून रात्रभर दाद देत जागेच राहावे लागले. अर्थाचे सूत्र तुम्ही ठीक गाठले आहे.
आपला,
(आत्माराम रावजी देशपांडे)
अनिल
(संपादित)
निवडक वाङ्मयीन पत्रे
'कवी अनिल यांची संपूर्ण कविता. संपादक - श्याम माधव धोंड' या पुस्तकातून.
सौजन्य- विजय प्रकाशन, नागपूर
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.