ते जुळे न बाई मला
नीट नीवीची गाठ न जुळते
नीरीवरती नीरी न मिळते
कटीवरुनी सरते, ओघळते
असो वरी मेखला
हवी कशाला मणी-भूषणे
जवळी असता अहेव लेणे
डागतील मज सये दागिने
माळिन चंपकफुला
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | आशा खाडिलकर |
नाटक | - | धाडिला राम तिने का वनी? |
राग | - | अमृतवर्षिणी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अहेव | - | सुवासिनी. |
कटि | - | कंबर. |
नीवी | - | कमरेचे वस्त्र. |
मेखला | - | कमरपट्टा. |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
वल्कल | - | वृक्षाच्या सालीचे केलेले वस्त्र. |
नाटकाचे लेखक आणि नेपथ्यकार द. ग. गोडसे, दिग्दर्शक दाजी भाटवडेकर, संगीत दिग्दर्शक पंडित जितेंद्र अभिषेकी, कविवर्य राजाभाऊ बढे, संघाचे तात्या आमोणकर यांच्याबरोबर काम करताना जे अनुभव आले, त्याचं हे स्मृतिरंजन !
बुवांनी पहिलीच चाल केली - 'लेवू कशी वल्कला?' राजाभाऊ बढे यांच्या एकेकाळच्या गाजलेल्या भावगीताचा त्यांनी कायापालट करून टाकला. आशा खाडिलकरला अमृतवर्षिणी रागातलं झपतालात बांधलेलं पद शिकवताना सर्वजण चकित झाले होते. मी हळूच गोडसेंकडे पाहिलं. बुवांच्या बुद्धिमत्तेची झलक मिळाल्याचं त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. राजाभाऊंच्या पूर्वीच्या संगीतिकेतल्या गीतांची फाइलच आमच्याकडे होती. 'लेवू कशी वल्कला?', 'मंद मंद ये समीर', ‘कधी भेटेन वनवासी', 'आले रे बकुळफुला' ही राजा बढे यांची एकेकाळी गाजलेली भावगीतं. त्यांना नवीन साज चढवायचा म्हणजे संगीत दिग्दर्शकाला आव्हानच होतं. पण बुवांनी ते सहज पेललं. काही भावगीतांना चाली दिल्यावर पौराणिक नाटकात शोभून दिसतील, अशी काही चिजांवर आधारित गाणी लिहून देण्याची विनंती बुवांनी राजाभाऊंना केली. रामाची गाणी आणि कैकयीची पदं रामायणकालीन प्रसंगांना शोभतील अशीच झाली.
याबद्दल राजाभाऊ थोडेसे नाराज होते. कवीही मोठा होता आणि संगीत दिग्दर्शकही मोठा होता. मी राजाभाऊंना म्हटलं, "तुमची सर्व गाणी चांगलीच आहेत. ती एकेकाळी गाजलेलीही आहेत. आता त्यावर अभिषेकींच्या चालीची मोहर उमटल्यावर त्यांना एक वेगळं 'अभिषिक्त रूप' आलंय. शिवाय विषय संस्कृतप्रचुर असल्यामुळे अभिजात संगीतावर आधारित पदं असणं आवश्यक आहे. तुमच्या काव्याचा अनादर करण्याचा हेतू नाही."
अभिषेकी येण्याच्या आधी गोडसेंनी गाणी घालण्याच्या जागा पक्क्या करून टाकल्या होत्या. राजाभाऊंनी लिहिलेली गीतं त्यात घालूनही टाकली होती. अर्थात त्यात बराच बदल करावा लागला. प्रतिमागृहाच्या प्रवेशात प्रत्येक राजाची ओळख करून देताना 'साकी' असं लिहिलं होतं. कैकयीबरोबरच्या प्रवेशात 'तुज म्हणू कसे भी जननी?' हे पद भरताच्या तोंडी होतं. मी दाजींना म्हटलं, "या प्रवेशात गाणी आली तर सगळ्या प्रवेशाचा विचका होईल."
शेवटी ते सगळं गोडसेंना मलाच पटवून द्यावं लागलं. कैकयी आणि भरत यांच्या पदांच्या जागा गोडसेंना विचारून नक्की केल्या. साक्या रद्दबातल ठरवल्या हे ठीक. पण 'धाडिला राम का तुवा वनी?' हे पद- ज्या पदावरून नाटकाला नाव दिलं- तेच कट झालं ! त्या गडबडीत अभिषेकीबुवांनी त्या पदाला चालही लावली. पटवापटवी करण्यात आतापर्यंत मी पटाईत झालो होतो.
मी गोडसेंना म्हटलं, "तिसर्या अंकात मला पद नाही. कारण 'कधी भेटेन' दुसर्या अंकात आणलंय. हे गाण कट केलंय खरं, पण तिसर्या अंकात कैकयीकडे जाताना या गाण्यावर एक्झिट घेतली, तर ते जास्त परिणामकारक होईल."
ते प्रत्यक्ष करून दाखवल्यावर ते त्यांना पटलं. फक्त मूळ पद डायरेक्ट होतं ते इनडायरेक्ट करावं लागलं ते असं - 'तिज म्हणू कसे मी जननी, धाडिला राम का तिने वनी?' आणि नाटकाचं नाव सार्थ ठरलं !
(संपादित)
अरविंद पिळगांवकर
'धाडिला राम तिने का वनी?' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.