कमलसुतंतु करी करिं कंकण बंधित परि शोभे ती ॥
मदन निदाघ जनीं संचरुनी ताप समानचि देती ॥
युवतिस तपवि निदाघ जरी तो सुंदर कांति नुरे ती ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
नाटक | - | शाकुंतल |
राग | - | मालकंस |
ताल | - | त्रिवट |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कुच | - | स्त्रीचे स्तन / स्तनाग्रे. |
निदाघ | - | उष्णता / घाम. |
सन १८८० सालीं ता. ३१ आक्टोबर रोजीं पुण्याच्या रंगभूमीवर महाकवि कालिदासाची अभिनव कृति 'अभिज्ञान शाकुंतल', संगीत रूपानें पुन्हां अवतरली. त्यावेळीं भोजराजाची सभा हा प्रयोग पाहण्यास प्रत्यक्ष नव्हती; परंतु त्याच्या सर्भेत त्या वेळीं जीं विद्वद्रत्नें होतीं, त्याप्रमाणें वरील प्रसंगीं पुणें शहरांतील 'सकलकलागुणवेत्ते पंडित' रंगसभेंत जमले होते. प्रत्यक्ष कालिदासाच्या वेळेच्या नटवर्गाचा इतिहास इतक्या शतकांनंतर उपलब्ध असणें शक्य नाहीं; परंतु आद्यसंगीत नाटकाचे कर्ते अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा नटवर्ग, गायन व अभिनय या गुणांनीं इतका कुशल होता कीं, किर्लोस्कर यांचें कवित्व व नटांचें नाट्यनैपुण्य महाराष्ट्रभाषेच्या नाट्यकलेच्या इतिहासांत अजरामर होऊन बसलें आहे.
प्रस्तुत आवृत्तींत जी सुधारणा केली आहे ती, शाकुंतल नाटकांतील तत्कालीन प्रयोगांतील दुष्यंत, कृण्व, शकुंतला इत्यादि नटांचे प्रत्यक्ष व भूमिकांचे फोटो दिले आहेत. या नटांना प्रत्यक्ष ज्यांनीं पाहिलें नाहीं, त्यांना व भावी पिढ्यांना या फोटोंचें इतिहासदृष्ट्या महत्त्व वाटेल यांत शंका नाहीं.
'अभिज्ञान शाकुंतल' नाटकाची थोरवी परद्वीपस्थ पंडितांना मान्य झाली आहे. परंतु त्याची अधिक योग्यता किर्लोस्करांच्या समकालीन नटांनी योगरूपानें महाराष्ट्रीयांच्या प्रत्ययास आणून दिली आहे.
महाकवींच्या नाटकांची थोरवी त्या योग्यतेचे नट दाखवीत असतात. शेक्सपीयरच्या नाटकांचाही असाच प्रकार झाला आहे. त्याची खरी योग्यता त्याच्या नाटकाच्या यथार्थ नाट्यदर्शनानेंच इंग्लिश रंगभूमीला अवगत झाली. शेक्सपीयरनंतर थोड्याच दिवसांनी बेटर्टन नांवाचा एक अद्वितीय नट होऊन गेला (१६३५ - १७१०). इंग्लिश रंगभूमीवर त्याच्यानंतर एका ग्यारीकनेंच इतिहासांत नांव मिळविलें. या दोघांच्याही नाट्याच्या अनेक दंतकथा मागें राहिल्या आहेत. शेक्सपीयरचा खरा प्रकाश या दोघांनीच रंगभूमीवर पाडला. नाट्यकलेच्या सुदैवानें किलोस्करांची श्रेष्ठता दाखविण्याला मोरोबा, बाळकोबा व भाऊराव यांचे कर्णमधुर गायन व अर्थद्योतक अभिनयकर्ते कारणीभूत झाले व यांच्यामुळेंच किर्लोस्करांनीं नवें नाट्ययुग सुरू केलें, असा लौकिक किर्लोस्कर यांचा झाला, असें म्हणण्यास हरकत नाहीं.
प्रस्तुतच्या आवृत्तींत दुसरा एक फरक केला आहे. तो हा कीं, अव्वल प्रतींतील शब्दरचना, व पद्यरचना, यांत त्यानंतरच्या प्रतींत फेरफार केलेले होते- ते पुन्हां किर्लोस्करांच्या अव्वल प्रतीप्रमाणें दुरुस्त केले आहेत. याचें कारण किर्लोस्करानी शाकुंतलाचें जें भाषांतर केलें होतें- तें प्रयोगाकरितां होतें. त्यामुळें त्यांत जी शब्द व वाक्यरचना होती ती पात्रानुरोधानें केली होती. किर्लोस्करानीं शब्दशः म्हणून भाषांतर केलें नव्हते.
शिवाय भाषेच्या दृष्टीनें जें योग्य दिसेल तेंच वाक्य व शब्द त्यांनीं घातले होते. हें करतांना त्यांनीं अर्थहानि बिलकूल होऊं दिली नव्हती. 'आर्यभूषण'च्या प्रतींत आजपर्यंत जे फेरफार केलेले होते ते फक्त पुस्तकापुरतेच राहिले. रंगभूमीवर किर्लोस्करांच्याच वाक्यांचा, शब्दांचा उपयोग होत होता. संगीत हें जसें रागबद्ध व तालबद्ध असतें, तसें गद्य भागालाही स्वरभेद व वाक्यावर किंवा शब्दावर अवसान हें असतें. या दृष्टीनें किर्लोस्करांचीच भाषा सरस ठरते. पुढें भाषेच्या दृष्टीनें कसे फेरफार होतात याबद्दल दुसर्यांनीं केलेल्या शाकुंतलाच्या भाषांतरांचीं उदाहरणे दिलीं आहेत, ही पाहिलीं असतां प्रयोगदृष्ट्या कोणती भाषा योग्य आहे, हें समजून येईल.
शकुंतला सख्यांसह प्रवेश करते तो प्रसंग, अंक १ लाः
शकुंतला सख्यांना हांक मारते (संस्कृत)- "इत इतः सख्यौ" याचें भाषांतर तीन ग्रंथकारांनीं तीन प्रकारांनी केले आहे.
प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले- "सख्यांनो, इकडे इकडे या अशा"
रा. रा. के. वि. गोडबोले- "इकडून इकडून ग सख्यांनो."
आर्यभूषण प्रत- "सख्यांनो, चला इकडे या."
किर्लोस्करांच्या वेळीं शकुंतला बोलत होतीं तें वाक्य- "संख्यांनो इकडे या ग इकडे या."
शकुंतला व सख्या झाडांना पाणी घालतांना इतस्ततः हिंडत आहेत, ही कल्पना केली म्हणजे शकुंतला दोघी सख्यांपासून कांहीं अंतरावर गेली असून ती तेथून सख्यांस "इकडे या ग इकडे या" म्हणून हांक मारते आहे, ही कल्पना बरोबर वाटते.
(प्रसंग) शकुंतलेच्या वल्कलाच्या चोळीची गांठ प्रियंवदेने घट्ट बांधल्यामुळें ती जखडल्यासारखी झाली होती. ती गांठ सैल करण्यात तिनें अनसूयेस सांगितल्यावरून प्रियंवदा ह्मणते-
संस्कृत- "अत्र पयोधरविस्तारयितृ आत्मनो यौवनमुपालभस्व."
प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले- "मला ग बाई कां दोष देतेस याचा? आपल्या अंगांत मुसमुसणार्या तारुण्याला बोल लाव कीं !"
रा. रा. के. वि. गोडबोले- "(हंसत) याबद्दल स्तन पोसविणार्या तारुण्याला दोष लाव ! मला कां बाई उगीच?"
आतां किलोस्करांची प्रियवंदा काय म्हणते ती पहा- "(हंसत) सखे, तुझें तारुण्य घटकोपटकीं, तुझ्या अवयवांस वाढवीत आहे, म्हणून ही वल्कलाची चोळी अव्वळ झाली असेल, तर त्या यौवनावर रागाव. मज गरिबावर ग कां?"
रा. गोडबोले यांनीं 'पयोधर' याचें शब्दशः 'स्तन' असें भाषांतर करून तें प्रियंवदेच्या तोंडीं घातलें आहे. प्रियंवदेसारख्या तरुण मुलीच्या तोंडीं इतक्या उत्तान अर्थाचे शब्द असावयाचे नाहीत.
यापेक्षां किर्लोस्करांच्या शब्दांत, "तुझें तारुण्य घटकोघटकीं तुझ्या अवयवांस वाढवीत आहे." या वाक्यांत किती तरी अर्थ भरला आहे? मुलीच्या तोंडीं शोभण्यासारखें तें वाक्य आहे. कै. देवलांनी या ठिकाणी पुढील पद केलें आहे-
उगिच कांगे दोष मला देसी ।
वाढवी अवयव यौवन ह्मणूनी कंचुकी रुतली अशी ॥
हें पद प्रस्तुत प्रतींत योग्य ठिकाणीं घालावयाचें विस्मरणानें राहून गेलें. हें पद किती साधे व अर्थपूर्ण आहे?
किर्लोस्करांची शब्दयोजना मार्मिक असते. याचें पुढील उदाहरण घेण्यासारखें आहे, दुष्यंताच्या तोंडचें पद 'बायांनो द्या सोडोनी' यांतील चरण, 'स्वासानें उर थरथरलें अद्यापि किती तरी हालें' हें मुळच्या 'अद्यापि स्तनवेपथुं जनयति श्वासः प्रमाणाधिकः ।' या चरणाचें भाषांतर आहे. किर्लोस्करानीं या ठिकाणीं प्रौढ वाक्याची योजना करून मार्मिकपणा दाखविला आहे. प्रो. लेले यांनीं 'स्तन' शब्दाच्या ऐवजीं 'वक्षस्थळ' हा शब्द योजला आहे. तो कांहींतरी बरा आहे. परंतु रा. गोडबोले यांनी आपल्या भाषांतरांत 'स्तन पहा अद्यापिही कांपती' असे स्पष्ट म्हटलें आहे. तरुण मुलींशीं बोलतांना या शब्दाचा उपयोग सभ्य पुरुष कधींही करणार नाही. ही गोष्ट गोडबोले विसरल्यासारखें दिसतें. 'शाकुंतलां'त किलोस्करांनीं एका ठिकाणीं मात्र 'स्तन' या शब्दाचा उपयोग केला आहे, आणि तो सहाव्या अंकांत विदूषकाला चित्रांतील उणीवा राहिल्या आहेत त्या सांगतांना. तेथे ते लिहितात, 'न काढीली स्तनदेशिं रहायाची धवलचंद्रापरि माळ मृणालांची ।' या दिंडीत सदर शब्दाचा जो उपयोग केला आहे, तो योग्य स्थळींच केला आहे.
पद्यांत आर्यभूषण छापखान्याच्या आजपर्यंतच्या प्रतींत किर्लोस्करांच्या शब्दांच्या जागीं दूसरे शब्द घातलेले होते, परंतु या प्रतींत प्रकाशकांच्याच इच्छेवरून मूळचे शब्द पुन्हां घातले आहेत. किर्लोस्करांची मूळची पद्यरचना रसाळ व पात्रांना गातांना सुलभ अशी होती. आर्यभूषण छापखान्याच्या पूर्वीच्या प्रतींत श्लोकांचें शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केल्यामुळें तीं पद्यें म्हणतांना क्लिष्ट वाटतात. याचीं एक दोन उदाहरणें देतो-
अंक २ रा. दुष्यंताच्या,
'काय परम रमणीय सखीचें रूप कथं तुजला ।
ब्रह्मदेव अधिं सुंदर चित्रीं हात वळवि आपुला ।
मग बनवी हें रत्न विलक्षण ऐसें वाटे माझ्या मतिला ॥'
ही या पद्याची किर्लोस्करांची साधी व आटोपसर अशी शब्दरचना आहे; परंतु आर्यभूषण प्रतींत फेरफार केलेला होता तो-
'ब्रह्मदेव आर्धि सुंदर तनुची मूस मनीं ओती ।
मग बनवी स्त्री सृष्टिची नूतन, काया ऐशी वाटे हो ती ॥'
असा होता. या शब्दांच्या फेरफारानें पात्रास पद सहज म्हणतां येण्यासारखें नाहीं.
तसेच, 'नाहीं कोणीही हुंगीलें' या पद्यांत किर्लोस्करांची शब्द योजना खालीलप्रमाणे होती- 'नाहीं ज्यावरी घर्षण घडलें ऐसें मुक्तारत्नचि दिसलें' या ठिकाणीं पूर्वींच्या आर्यभूषणप्रतीत- 'नाहीं ज्याला वेज पाडिलें' असा पाठभेद होता. परंतु हा पाठ गातांना तोंडांत बरोबर बसत नाहीं.
पूर्वीच्या प्रतीत असे जे कांहीं वाक्यांचे व पद्यांचे मूळ संस्कृताला धरून फेरफार केले आहेत ते भाषांतरदृष्टीनें बरोबर असले तरी प्रयोगांत पात्राच्या तोंडीं बरोबर बसत नाहींत.
पद्यरचनेच्या दृष्टीनें किर्लोस्करांचें शाकुंतल सरस आहेच; परंतु भाषेच्या दृष्टीनेंही तें सरस ठरेल. पात्राच्या योग्यतेप्रमाणें त्यांनीं शब्दाची व वाक्याची योजना केली आहे, याची मागें उदाहरणें दिलीं आहेत. किर्लोस्करांचें भाषांतर रंगभूमीकरितां आहे हें जरी खरें आहे तरी मूळ 'शाकुंतला'चें स्वारस्य कोठेंही गेलें नाहीं. इतकेंच नाहीं तर खर्या मराठी भाषेनें तें बरोबर उतरले आहे. तिन्ही भाषांतरांची तुलना करून आम्हीं पाहिली, परंतु त्यांत मूळची अर्थहानि झाल्याचें कोठेंहि किर्लोस्करांच्या भाषांतरांत दिसत नाहीं. इतकें खरें कीं, किर्लोस्करांनीं संस्कृत शब्दाला प्रतिशब्द, तो वाक्यांत अगर पद्यांत बरोबर शोभो अगर न शोभो तो आपल्या भाषांतरांत दिला नाहीं. परशुरामपंत तात्यांनी आपल्या 'शाकुंतला'च्या भाषांतराच्या प्रस्तावनेंत जें ह्मटलें आहे कीं, "मूळ संस्कृत ग्रंथाचें हें भाषांतर असें म्हटलें आहे; परंतु केवळ शब्दास शब्द असें नाहीं. क्वचित् स्थळीं न्यूनाधिक्य केलें आहे."
अण्णासाहेबांनीं आपल्या शाकुंतलांत वरीलच तारतम्य दाखविलें आहे. एका भाषेंतून दुसर्या भाषेंत रूपांतर करतांना त्या भाषेची सरणी भाषांतरांत ठेवली म्हणजे वाचकांना ती दुर्बोध किंवा क्लिष्ट वाटत नाहीं. किर्लोस्करांनीं भाषांतरच केलें आहे, परंतु मुळांतील स्वारस्य व अर्थहानि कोठेही होऊं दिली नाहीं. इतकेंच नाहीं तर दुष्यंत व कण्व यांचीं सहाव्या व चौथ्या अंकांतील पद्यें म्हणतांना वाघोलीकर व नाटेकर मूर्तिमंत करुणरस वठवीत असत. स्थलाभावामुळें त्या पदांचा नुसता नामनिर्देश करण्यापलीकडे कांहीं करतां येत नाहीं. परंतु जे श्लोक पंडितांनीं शाकुंतलमध्ये श्रेष्ठ प्रतीचे म्हणून ठरविले आहेत त्यांचें भाषांतर पद्यांत इतकें उत्कृष्ट साधलें आहे कीं, तीं पद्यें ऐकून प्रेक्षकवर्ग तल्लीन होऊन जात असे. दुष्यंताचीं, 'बधिन स्वप्निं जरि तिला नये झोंप कधिं मला', 'उभि जवळ खरी ती बाला', स्वर्गीं सर्व पितर माझे ते' हीं पद्यें व कण्वाचीं, 'जाते कीं मम शकुंतला', 'जाईल कैसा तनये शोक मनाचा', 'परक्याचें धन कन्या तें त्या देउनि आज मि सुटलों' हीं पद्यें म्हणतांना, जणूं काय तीं पात्रें मूर्तिमंत पुढें उभीं असून शकुंतलावियोगाचा खरा प्रसंग आपणापुढें आहे, असा भास होत असे.
'संगीत शाकुंतल' नाटकाचा योगायोग कांहीं अपूर्व घडून आला होता. 'शाकुंतल'सारखें नाटक, किर्लोस्करांची सुरस पद्यरचना, प्रेक्षकवर्ग सहृदय व नटवर्ग अप्रतिम. इतक्या गोष्टी एकसमयावच्छेदानें जुळून आल्यावर सन १८८० हें वर्ष नाट्यकलेच्या इतिहासांत 'न भूतो न भविष्यति' असें होऊन गेलें म्हणून या वेळेचे प्रयोग पाहणारे लोक म्हणत आहेत, तें वृथा नाहीं.
नव्या आवृत्तींतील विशेष काय, यासंबंधानें विवेचन करतांना मूळच्या पाठांची नव्या आवृत्तींत अवश्यकता दिसून येईल. शेक्सपीयरच्या नाटकांतील असेच फेरफार त्याच्या नंतरच्या प्रकाशकांनीं व नटांनीं मनासारखे केले आहेत. परंतु इतिहाससंशोधकांनीं, खुद्द शेक्सपीयरच्या अव्वल प्रतीचे पाठ संशोधन करून प्रकाशित केले आहेत. किर्लोस्करांची अव्वल प्रत दुर्दैवानें आतां दुर्मिळ झाली आहे, तेव्हां स्मरणानें व कांहीं किर्लोस्कर मंडळीतील तत्कालीन नटांच्या स्मृतीनें जेवढे पूर्वपरिचित शब्द व वाक्यें या प्रतींत दुरुस्त करतां आलीं तितकीं केलीं आहेत.
विशेष गोष्ट ही कीं, आर्यभूषणच्या मालकांनीं पूर्वस्वरूपांत 'संगीत शाकुंतल' छापण्याचें मनावर घेतलें. यामुळें ही आवृत्ति संस्मरणीय होईल, अशी आशा आहे.
चाळीस वर्षांच्या अवर्धीत संगीत शाकुंतल नाटकाच्या पांच-पंचवीस आवृत्त्या व प्रती निदान लाख-दीड लाख तरी निघाल्या असतील. मराठी भाषेंत प्रसिद्धीचा एवढा मान 'संगीत शाकुंतल' या नाटकालाच आहे यांत शंका नाहीं.
(संपादित)
शं. बा. मुजुमदार
दि. १५ डिसेंबर १९२९
(शंकर बापूजी मुजुमदार हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे व्यवस्थापक, अभिनेते, मुद्रणतज्ज्ञ, संपादक आणि चरित्रलेखक होते.)
'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पुस्तकाच्या १९३० सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक, आर्यभूषण)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.