A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणीतरी बोलवा दाजिबाला

मी तर जाते जत्रंला
गाडीचा खोंड बिथरला
बळ नाही घरच्या गणोबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबा सारखा दिर दुनियेमध्ये नाही
गोर्‍या भावजयीची त्यांना लई अपूर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंदट आमच्या नशिबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढं घेतील हसून चटदिशी
निघता निघता उशीर झाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्या बसल्या
अंगाला अंग लागतं अन्‌ होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या
मी लई भुलते रुबाबाला
कुणीतरी बोलवा दजिबाला

साज शिणगार केला, ल्याले साखळ्या-तोडे
ऐन्याची घातली चोळी अन्‌ जरीचे लुगडे
अशा मध्ये असावे संगे दाजिबा तगडे
म्होरं मग ठाऊक जोतिबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला