A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृष्णा पुरे ना थट्टा

कृष्णा पुरे ना ! थट्टा किती ही
खडा घड्याला मारु नको
या राधेला अडवु नको

जळामृते हा घट भरलेला
घेउन जाणे मजसी घराला
सोड वाट रे झणि गोपाळा
घरी परतण्या उशीर नको

हिसळत जळ हे, भिजते साडी
असली कसली भलती खोडी
काय वाटते तुजला गोडी
वृथा मुकुंदा छळु नको

तुझ्या संगती क्षणभर येता
विसरुन जाते काम सर्वथा
ओढ लागते माझ्या चित्ता
भुरळ मनाला पाडु नको
झणी - अविलंब.
सुधीर फडके यांचं 'गीतरामायण' त्या काळात खूपच लोकप्रिय झालं होतं. रामाप्रमाणे कृष्णाच्या चरित्रातही खूप वैविध्य व आदर्श व्यक्तिमत्त्वाचे प्रसंग आहेत हे जाणून कवी श्री. म. पां. भावे यांनी 'गीतकृष्णायन' हे गीतबद्ध केलं. त्याला मी चाल लावून त्याचे बरेचसे प्रयोग सादर केले होते. त्यावेळेपर्यंत म. पां. भावे यांचं एकही गाणं रेकॉर्ड झालं नव्हतं. ते मला म्हणाले, "पुजारी, माझं एखादं गाणं तुम्ही रेकॉर्ड का करत नाहीत?" मी म्हटलं, "जरूर करूया." त्या 'गीतकृष्णायन' मध्ये एक गाणं राधेच्या तोंडी होतं.
कृष्णा पुरे ना, थट्टा किती ही
खडा घड्याला मारु नको
या राधेला अडवु नको

या गाण्याची चाल चांगली जमली होती. जलद व उडत्या चालीचा ठेका पण निरनिराळ्या लग्‍ग्या लावून गाणं रंजक केलं होतं. तेच गाणं रेकॉर्डिंगसाठी घ्यावं असं ठरलं. गायिका पण चांगली मिळाली. माणिक वर्मांनी हे गाणं इतकं सुंदर म्हटलंय की संपूर्ण महाराष्ट्रात हे गाणं 'गवळण' म्हणून गाजलं, प्रसिद्ध झालं.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.