A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मामाची रंगीत गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो !

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट
सारी सपाट वाट
मउ गालीचे ठायीठायी हो !

शीळ घालून मंजूळवाणी हो
पाजी बैलांना ओहळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगूरमाळा हो
गाई किलबिल विहंगमेळा हो
बाजरीच्या शेतात
करी सळसळ वात
कशी घुमवी आंबेराई हो !

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती
नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो !
Random song suggestion