A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोठें सीता जनकनंदिनी

उजाड आश्रम उरे काननीं
कोठें सीता जनकनंदिनी?

सांग कदंबा बघुनी सत्वर
दिसते का ती नदीतटावर?
करी कमंडलु, कलश कटिवर
हरिमध्या ती मंदगामिनी

सांग अशोका शोकनाशका !
कुठें शुभांगी क्षमा-कन्यका?
कंपित कां तव पल्लव-शाखा?
अशुभ कांहिं का तुझिया स्वप्‍नीं?

कुठें चंदना, गौरांगी ती?
कुंदलते, ती कोठें सुदती?
कोठें आम्रा, विनयवती ती?
शहारतां कां वार्‍यावांचुनि?

घात-घटी का पुन्हां पातली?
सीते, सीते, सखे मैथिली !
हांक काय तूं नाहिं ऐकिली?
येइ, शिळेच्या बसूं आसनीं

पहा लक्ष्मणा, दिसती डोळे
प्रियेचेच ते विशाल भोळे
मृगशावक हें तिचें कोवळें
कां याच्याही नीर लोचनीं?

अबोल झाले वारें पक्षी
हरिली कां कुणि मम कमलाक्षी?
का राक्षस तिज कोणि भक्षी
शतजन्माचें वैर साधुनी?

पुनश्च विजयी दैव एकदां
घातांवर आघात, आपदा
निष्प्रभ अवघी शौर्यसंपदा
जाइ बांधवा, पुरा परतुनी

काय भोगणें आतां उरलें?
चार दिसांचें चरित्र सरलें
हे दुःखांचे सागर भरलें
यांत जाउं दे राम वाहुनी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र जोगिया
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २८/१०/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
कटि - कंबर.
कुंद - एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा.
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
क्षमा - पृथ्वी / दया, माफी.
कानन - अरण्य, जंगल.
घटी - घटका, वेळ.
नंदिनी - कन्या.
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).
मंदगामिनी - मंद गतीने चालणारी स्‍त्री.
शावक - मूल.
सुदती - सुंदर दात असलेली स्‍त्री.
हरिमध्या - सिंहासारखी कंबर असलेली.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण