A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कितीक काळ हालला

कितीक काळ हालला
असा तुझ्याविना
कळे न श्वास चालला
कसा तुझ्याविना

दहिंवरल्या प्रहरातून
वाट पाहते पहाट
बहर गळे दरवळला
कसा तुझ्याविना

लवथवत्या पानावर
गहिवरते भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे
कसा तुझ्याविना

तमामधुन सावकाश
उजळे आकाश निळे
चळे उदास चंद्रमा
कसा तुझ्याविना

तार्‍यांचा धरून भार
रात्रिस उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे
कसा तुझ्याविना !