विसरलों कैसें देहभान
झाली झडपणी झाली झडपणी
संचरलें मनीं आधीं रूप
ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी
ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप
ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त
सुखरूप अद्वैत झाले बाप
गीत | - | संत गोरा कुंभार |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | प्रकाश घांग्रेकर |
नाटक | - | संत गोरा कुंभार |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत, संतवाणी |
आदि (आधी) | - | प्रारंभ / प्रमुख. |
झडपणी | - | वारा घालणे / पंखा / भूतबाधानिरसन. |
द्वैत | - | जोडी / भेदभाव / देह व जीव वेगळे मांडणे / एका वनाचे नाव. |
पिसे | - | वेड. |
केशवाचे भेटी लागलें पिसें ।
विसरलें कैसें देहभान ॥१॥
झाली झडपणी झाली झडपणी ।
संचरलें मनीं आधीं रूप ॥२॥
न लिंपेची कर्मि न लिंपेची धर्मी ।
न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥३॥
ह्मणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त ।
सुखरूप अद्वैत नामदेव ॥४॥
मुक्ती ही मरणानंतर मिळवायची नसते. ती जिवंतपणी मिळवायची असते. ती मिळवण्यासाठी काय करावे लागते, ते दर्शविणारा संत गोरा कुंभार माउली आणि संत नामदेव माउली यांच्या भेटीच्यावेळी हा अभंग रचला गेला आहे.
संत नामदेव माउलीचे अगदी यथातथ्य वर्णन संत गोरोबा माउलीने केले आहे. संत नामदेव माउली जीवन्मुक्त झाली होती. ही जीवनमुक्त अवस्था तिच्या जीवनात कशी आली, ते संत गोरोबा माउलीने अचूकपणे हेरले होते. काय होते त्याचे रहस्य?
केशवाचे भेटी लागलें पिसें ।
विसरलें कैसें देहभान ॥
परमेश्वराच्या भेटीची संत नामदेव माउलीला तीव्र तळमळ लागली. त्या तळमळीने तिला वेड लावले. आपले देहभान ती विसरली.
झाली झडपणी झाली झडपणी ।
संचरलें मनीं आधीं रूप ॥
परमेश्वर नावाच्या भूताने माउलीला अगदी झपाटून टाकले. परमेश्वर हेच माणसाचे मूळ रूप आहे. त्याच रूपाचा संचार संत नामदेव माउलीत झाला.
लिंपेची कर्मि न लिंपेची धर्मी ।
ना लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥
परमेश्वराने माणसाला झपाटून टाकले की माणूस कर्मे तर सगळी करतो. पण मनाने त्यांच्यापासून अलिप्त रहातो. त्याच्या मनात ईश्वरचिंतन सदैव चालू असते. त्यामुळे कर्मातील सुखदुःखांचा, अडचणींचा, अडथळ्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. नामदेव माउली ही अशी सर्व कर्मांपासून अलिप्त झाली. अगदी धर्म, कर्म, पुण्यपाप यांच्याही पलीकडे गेली. कोणत्याही गोष्टीच्या गुणधर्माचा तिच्यावर परिणाम होईना. हीच जीवनमुक्त अवस्था होय. माउली भगवंतापाशी एकरूप झाल्याने अशी अवस्था सहजपणे तिच्या जीवनात आली. एकदा या अवस्थेला पोहोचल्यावर सारा आनंदच आनंद ! त्यामुळे नामदेव माउली सुखरूप, आनंदमय बनली.
ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त ।
सुखरूप अद्वैत नामदेव ॥
जे पिसे संत नामदेव माउलीला लागले, तेच आपल्यालाही लागले पाहिजे. मग हीच जीवन्मुक्त अवस्था आपल्याही जीवनात येऊ शकते.
(संपादित)
डॉ. जोगेश्वर नांदुरकर
सौजन्य- दै. नवशक्ति (प्रकाशन दिनांक अनुपलब्ध.)
(Referenced page was accessed on 19 April 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.