वाद्यमेळाचा वापर
ऑर्गन, तबला, सारंगी किंवा व्हायोलिन आणि हार्मोनियम अशी वाद्ये साथीला असली म्हणजे गायकाला पुरेसा स्वर-भरणा मिळून तो बैठक जमवतो.
परंतु ज्या वेळी गीताला स्वतंत्रपणेही वाद्यवृंदाची जोड द्यावी, असे रचनाकाराला वाटू लागले त्या वेळी फ्ल्यूट, सतार, पियानो इत्यादी वाद्यांचाही हळूहळू वापर होऊ लागला. प्रत्यक्ष गीताचे शब्द सुरू होण्यापूर्वी एक वातावरण निर्माण करण्यास या वाद्यमेळाचा उपयोग होऊ लागला. गाताना गायकाला मधून मधून विश्रांती मिळावी म्हणून एखाद्या ओळीची पुनरावृत्ती वाद्यमेळावर केली जाऊ लागली. तसेच वाद्यमेळाची मदत विशिष्ट सुरापर्यंत गाणे (शब्दाविना) पोहोचविण्यासाठी घेतली जाऊ लागली.
तरीही १९६० - ६५ पर्यंत वाद्यमेळाचे स्थान तसे गौणच होते. मात्र पुढे पुढे सिनेमातील गाण्यांचे अनुकरण करण्यासाठी म्हणा किंवा वाद्ये अधिक संख्येने वापरण्याची हौस म्हणून म्हणा, वाद्यमेळाचा उपयोग वाजवीपेक्षा जास्त होऊ लागला. हल्ली काही काही ध्वनिमुद्रिकांत हा वाद्यमेळ शब्दांनाही खाऊन टाकतो. गीताचे शब्दप्रधान स्वरूप त्यामुळे बिघडते.
इतकेच काय पण चांगले शब्द नसू देत, आपण वाद्यमेळानेच गीत आकर्षक करून दाखवू अशी ईर्ष्या काही रचनाकारांत निर्माण झालेली आहे. ही प्रथा जर अशीच चालू राहिली तर गीतरचनेला चांगले शब्द शोधण्याची जरुरीच नाहीशी होत जाईल. आणि परिणामी आम्ही आशयघन अशा चांगल्या कवित्वाला पारखे होऊ अशी भीती वाटते. ललित संगीताची ही फार मोठी हानी समजायला हवी.
कवीच्या अंत:करणातील प्रामाणिक भावनेचा आविष्कार योग्य शब्दांअभावी चांगला होणार नाही. त्यामुळे भावगीताची मूळ प्रकृतीच रोगट राहील. चांगल्या गळ्याचे गायक काय किंवा चांगल्या चालीची वैशिष्ट्ये काय, अशा रोगट शब्दरचनेत प्राण भरू शकणार नाहीत.
ज्यांच्या हाती भावगीताचा प्रसार करण्याची साधने आहेत (रेडिओ, ग्रामोफोन कंपनी, टेलिव्हिजन, संगीत सभा) त्यांनी धंदेवाईक दृष्टीबरोबरच कलेतल्या चांगल्या गुणांशीही थोडेसे इमान राखण्याचा प्रयत्न केला तर भावगीत परंपरेला उज्ज्वल भविष्य लाभेल यात शंका नाही.
भावगीतांच्या या अखंड परंपरेत कालानुसार काही बदल अपरिहार्यपणे होईल. तो झालेला बदल कधी टिकेल तर कधी विरेलही. पण काही गोष्टी अशा असतील की ज्यांचे मूल्य चिरंतनच राहणार. त्यांतील एक सर्वसामान्य गोष्ट जरी या क्षेत्रातल्या कलावंतांनी जपली तरी या भावगीत परंपरेचे थोडे तरी ऋण आपण फेडल्यासारखे होईल. ती गोष्ट म्हणजे कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक या तिघांनीही आपापल्या पातळीवर कलेचा प्रामाणिक आविष्कार करावा. त्यामुळे भावगीतांची परंपरा समृद्ध आणि सुदृढ होईल.
(संपादित)
यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
अनेक स्तरांवरच्या वाचकांचं समाधान करण्याची क्षमता अनिलांकडे होती. अनिलांचा वाच्यार्थही आम जनतेला सुखकारक वाटतो आणि जेव्हा तो संगीतातून 'आज अचानक गाठ पडे' किंवा 'गगनि उगवला सायंतारा' असा श्रुतिरम्य होऊन प्रकटतो तेव्हा गगन दिसायला लागतं लोकांना.. अनिलांचा वाच्यार्थ सामान्यांसाठी असतो. संगीतातून व्यक्त होतो तेव्हा तो आणखी आवाहक होतो.
आता 'झळ' हीच कविता घ्या न. त्यातली केळ एकदम वाचणार्याच्या डोळ्यांपुढेच उभी होते. मात्र-
केळीचे सुकले बाग
असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पानं
असुनि निगराणी
यातले नुसते शब्द, ओळी वाचून केवळ वाच्यार्थावर जाऊ नका, तर-
कुठे तरी पेटला वणवा
भडके बन सारे
आणि
किति दूरचि लागे झळ
आतल्या जीवा
हेही जरा समजून घ्या. अशी पूर्ण कविता जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा,
केळीचे सुकले प्राण
बघुनि भवताली
असं शेवटी वाचल्यावर लक्षात येतं की, ती केवळ पाणी मिळालं नाही किंवा निगराणी झाली नाही म्हणून नाही सुकली, तर तिच्याभोवती दूर वणवा लागला आहे. आणि त्या वणव्याच्या झळीने तिचे प्राण कासावीस होत आहेत.
कवी हा कलावंत आहे. त्याला इथं भारतातही महायुद्धाची धग पोळते आहे; कारण त्याची संवेदनाच इतकी उत्कट आहे की, त्या धगीमुळंच त्याचे प्राण सुकले आहेत; प्राण गेले मात्र नाहीत. हा व्यंग्यार्थ कळायला, तुम्ही शब्दनिष्ठ आकलन, वाक्यनिष्ठ आकलन सोडून समग्र कवितेचा एक वाक्य असल्यासारखा आस्वाद घेतला पाहिजे. तरच तुम्हाला अनिलांच्या कवितेतील व्यंग्यार्थ आणि सामर्थ्य कळेल.
काय सुंदर कविता आहे ! कवीची निर्मितिप्रक्रिया म्हणजे जगातल्या निर्मितिमूल्यावर हल्ला होतो आहे. हिंसाचारामुळे ! मग तो महायुद्धातला हिंसाचार असो की आजचा दहशतवाद असो. आजही ती कालजयी अशीच कविता आहे !
यात एक गोष्ट मुद्दाम सांगतो पाहा. दीर्घ ईकार हस्व घेतले आहेत. त्यामधे त्या कवितेची सैरभैर वृत्ती प्रकट होते, असा आशयसापेक्ष भाव आहे. पाहा नं.
'कोमजलि'चा 'लि', 'असुनि'चा 'नि', 'अशि'चा "शि', 'जळति'चा 'ति' वगैरे, आपण जेव्हा उत्कट होतो- वाईट किंवा चांगलं काहीतरी सांगू बघतो, तेव्हा आपण भरभर बोलतो. दीर्घ किंवा हेल काढून उच्चारत नाही. तसे या कवितेत सगळे दीर्घ उच्चार हस्व करून टाकले आहेत. तो छंदःशास्त्रीय प्रयोग नाहीय. तो आशयसापेक्ष सहज झालेला प्रयोग आहे. आशयातून निर्माण झालेला तो विशेष आहे.
'किती दूरची' नव्हे ! दीर्घ नाहीच, आणि विशेष म्हणजे, कवी अनिल जी वर्हाडी बोलायचे, तिचं वैशिष्ट्य दीर्घ उच्चार हेच आहे ! ते टाळले आहेत त्यांनी इथे. विदर्भातला माणूस पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त दीर्घ उच्चार करतो; पण इथे त्याउलट आहे. त्यातून त्या कविमनाची लगबग, हुरहुर, सैरभैर वृत्ती प्रकटते आहे; पण हे कोणाला कळेल? हे व्याकरणानी अन् साहित्यशास्त्रानी सिद्ध होऊ शकत नाही. हे फक्त प्रतीतीनीच जाणवू शकते. तसं जाणवत नसेल तर तो प्रतीतिदोष म्हटला पाहिजे.
किति जरी घातले पाणी
सावली केली
केळीचे सुकले- प्राण
बघुनि भवताली
'केळीचे सुकले' नंतर डॅश आहे- मग प्राण; कारण प्राण गेले नाही तर सुकले आहेत. केळ निर्जीव नाही झाली आहे. जीवनात जेव्हा संहार व्हायला लागतो, मग तो कुठलाही असो, मूल्यसंहार असेल, दलितांबर अन्याय असेल, स्त्रीजातीवर अन्याय असेल किंवा नियती मानवावर अन्याय करत असेल, तर हा अन्याय, हे दुःख, हे शोषण, ही विषमता पाहून कलावंत माणूस म्हणून नुसता हळहळत नाही तर त्याच्या निर्मितिप्रक्रियेवर त्याचा आघात होतो. ती सृजनशक्ती या संहारामुळे बाधित होते, कोमेजते. उलट शांततेचा, सुखाचा, शोषणरहिततेचा काळ असेल तर मानवी निर्मितिप्रक्रिया बहरते. हा वैचारिक सिद्धांत आहे. पण इथे तो वैचारिक न राहता त्या सिद्धांताला मुळाचं रूप देऊन त्यातून एक विलक्षण भावानुभूती या कवितेत प्रत्ययाला येते.
(संपादित)
ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुळकर्णी यांच्या श्याम माधव धोंड यांनी घेतलेल्या मुलाखतीतून.
कवी अनिल यांची संपूर्ण कविता. संपादक - श्याम माधव धोंड. या पुस्तकातून.
सौजन्य- विजय प्रकाशन, नागपूर
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.