A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कठिण कठिण कठिण किती

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई ।
स्त्री-जातीप्रति झटतां अंत कळत नाहीं ॥

रंगुनि रंगांत मधुर मधुर बोलती ।
हंसत हंसत फसवुनी हृद्‍बंध जोडिती ॥

हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती ।
पदर पदर परि शेवटिं तुटत तुटत जाई ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वराविष्कार- मास्टर दीनानाथ
आशा भोसले
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - भावबंधन
राग - यमनकल्याण
ताल-दादरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• भावबंधन नाटकांतील काही पदें राम गणेश गडकरी यांची व काही श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची आहेत. दोघांच्याही पदांसह छापलेल्या पहिल्या आवृत्तीत गडकर्‍यांच्या पदांच्या इथे ' * ' अशी खूण करण्यात आली होती. ती तितकिशी सुस्पष्ट न वाटल्याने पुढील आवृत्तीत गडकर्‍यांची पदें ठळक अक्षरांत छापण्यात आली होती.
त्यानुसार 'कठीण कठीण किती'चे रचनाकार राम गणेश गडकरी आहेत.
'भावबंधन' हे संगीत नाटक असले तरी संगीतामुळे गाजलेले नाटक नाही. गडकर्‍यांच्या आजारीपणामुळे आणि अकाली मृत्युमुळे त्यांना या नाटकातली पदे करता आली नाहीत. एकंदर पंचेचाळीस पदांपैकी नमनाची तीन गीते धरून एकंदर दहा रचना गडकर्‍यांच्या असून बाकीची पदे, गडकर्‍यांच्या मृत्यूनंतर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी रचिली आहेत. 'भावबंधना'तील प्रसंग आणि संवाद यांच्याशी संगीत एकजीव झालेले नाही. नाटकाच्या ऐन बहराच्या काळात सुद्धा 'कठिण कठिण कठिण किती' (१-२) आणि 'शांत मनी या' (३-३) ही उडत्या चालीची दोन पदेच लोकप्रिय झाली होती.

'भावबंधन' हे एक सर्वस्वी स्वतंत्र नाटक आहे.

'भावबंधन' नाटकाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या 'सहचारिणी' नाटकाशी लागाबांधा जोडण्यात काही अर्थ नाही. 'सहचारिणी' नाटक १९१७ सालच्या डिसेंबर महिन्यात गडकर्‍यांनी वाचले; त्यानंतर ते 'गंधर्व नाटक मंडळी'च्या रंगभूमीवर आले आणि लवकरच बंद पडले !

"मला या वेळी एका नव्या प्लॉटचा 'जर्म' ( germ ) सापडला आहे. एका पक्क्या व्हिलनच्या ताब्यात एक भाबडा म्हातारा सापडला आहे. या कल्पनेवर एक सुंदर आणि चटकदार कॉमेडी लिहिता येईल. मी या 'जर्म'वर प्लॉट टाकतो." 'सहचारिणी' नाटक वाचल्यानंतर गडकरी असे बोलले होते, अशी एक आठवण गडकार्‍यांचे मित्र आणि सुप्रसिद्ध कादंबरीकार विठ्ठल सीताराम गुर्जर हे सांगत असत. या आठवणीच्या आधारावर 'भावबंधन' आणि 'सहचारिणी' या नाटकांचा ऋणानुबंध प्रस्थापित करणे, म्हणजे सुताने स्वर्गाला जाण्यासारखेच समजले पाहिजे. मात्र, 'एक सुंदर आणि चटकदार कॉमेडी लिहिणे' इतकाच गडकर्‍यांचा हेतू होता, हे महत्त्वाचे आहे.

एखाद्या माणसाच्या स्वभावामुळे, एखाद्या घटनेमुळे प्रतिभाशाली नाटककाराला एखादा 'जर्म' केव्हा आणि कोठे सापडेल याचा नियम नसतो. जर्म म्हणजे त्याच्या प्रतिभेला चालना देणारे एक निमित्त. 'सहचारिणी' नाटकातील एखाद्या पात्राच्या स्वभावामुळे किंवा एखाद्या घटनेमुळे गडकर्‍यांना एक कल्पना सुचली, नंतर अनेक कल्पना सुचल्या आणि यथावकाश 'भावबंधन' नाटक तयार झाले, इतकेच फार तर म्हणता येईल. एरवी 'भावबंधन' आणि 'सहचारिणी' या नाटकांच्या कथानकांत, पात्रांत, प्रसंगांत आणि स्वभावचित्रणांत कोणतेही साम्य नाही, विषयात किंवा आशयात सुद्धा नाही. 'भावबंधना'तील व्हिलन घनःशाम आणि 'सहचारिणी'तील रावजी किंवा 'सहचारिणी'तील भाबडा म्हातारा, रंगराव, आणि 'भावबंधना'तील धुंडीराज यांच्यांत कोणतेही साम्य नाही. घनःशामाच्या कचाटयात धुंडिराज सापडला पण 'भावबंधन' नाटकातील ती केवळ एक घटना आहे. ती घटना ज्या पद्धतीने घडविली गेली आणि तिचे जे परिणाम झाले, तसे 'सहचारिणी' नाटकात काहीही पडत नाही.
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर दीनानाथ
  आशा भोसले