A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कसें कसें हांसायाचें

कसें? कसें हांसायाचें?
हांसायाचें आहे मला,
हांसतच वेड्या जिवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा..

हांसायचें
कुठें? कुठें आणि केव्हां?
कसें? आणि कुणापास?
इथें भोळ्या कळ्यांनाही
आंसवांचा येतो वास..
गीत - आरती प्रभू
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- जुलै १९५६.
केवळ काव्यात्मता असलेली आणि गेयता नसलेली, गीते निवडून त्याला चाली कुणी लावल्या असतील तर हृदयनाथ मंगेशकर यांनी. प्रयोग करण्याची ईर्ष्या आणि नवीन स्वरगुंफ प्रस्थापित करण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी हे सगळे केले, ते काहीसे आव्हान स्वीकारण्याच्या भूमिकेतून.

परंतु त्यांनी योजलेल्या स्वरांमुळे आधीच गूढ असलेला कवितेचा आशय काही प्रमाणात तरी सोपा झाला, असे कुठेच घडले नाही. 'समईच्या शुभ्र कळ्या' किंवा 'कसे कसे हसायचे', 'माझे गाणे' इत्यादी रचना ऐकल्यानंतर श्रोत्याला चांगले साहित्य ऐकून समजल्याचे समाधान काही मिळत नाही. त्याला केवळ संगीत-दिग्दर्शकाच्या कल्पक स्वरयोजनेचा प्रत्यय येतो. दोन किंवा अधिक सूर अनाकलनीय आणि अतर्क्य अशा पद्धतीने एकत्र आल्यावर कधी सुखद तर कधी कटू असा परिणाम श्रोत्यांच्या मनावर होतो. प्रस्थापित स्वरसंगतीपासून दूर जाण्याकडे या संगीत-दिग्दर्शकाचा एकूण कल दिसत असला तरी पारंपरिक स्वरांचेही त्यांना वावडे नाही. या दृष्टीने 'घनु वाजे घुणघुणा', 'पांडुरंग कांती' इत्यादी भक्तिगीतांसाठी त्यांनी दिलेले स्वर मनाला धुंद करतात. आणि परंपरागत भक्तिसंप्रदायात नेऊन सोडतात.

मूळ भावनेशी एकरूपता त्यांनी अनेक गीतात राखली आहे. 'डोलकर' या कोळी-गीतातील काळजाला भिडणारी स्वररचना अकृत्रिम आणि लोभस आहे.
(संपादित)

यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.