A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कसें जिवांना झुलवित जावें

कसें जिवांना झुलवित जावें;
उपजत होती तुला कला ती.
कसें कुणाला फुलवावें अन्‌
कशी करावी क्षणांत माती.

कसे वदावे शब्द दुहेरी;
कसें पांघरावें परकेपण;
कसें पहावें- नसतां पाहत
हलक्या हातें घालावे घण.

कशी धरावी मान करारी;
कशी करांनी दाबावी कळ;
कशी स्‍निग्धता आणुन नेत्रीं
आशेचें उठवावें मोहळ.

कसें ढगांतुन मुरकत जावें
केसामधुनी गुंफुन तारे !
क्षणांत द्यावे दोन करांनीं,
क्षणांत घ्यावें काढुन सारें.

उपजत होती तुला कला ती
उपजत होतें मला खुळेपण;
तुझ्या कलेंतच तुजला तृप्ती;
फक्त रितें हें माझें जीवन.