कधी सावळी छाया
कधी वेल कृशांगी
कधी पुष्कळा काया
दर वळणावरती अनोळखी झालीस
मी ओळखिले तू.. होय, तूच आलीस
ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | मंगेश गोसावी |
स्वर | - | हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी-रानडे |
अल्बम | - | लय |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत |
कृशांगी | - | सडपातळ अंगाची स्त्री. |
ही माझी कुठलीही कविता कुणाही विवक्षित व्यक्तीला उद्देशून नाही, हे पटवून देताना माझी मात्र दमछाक व्हायची. कुणाही कवी, कलावंतांचं दैनंदिन लौकिक आयुष्य आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिगत स्वरूपाचं मानसिक पातळीवरचं जगणं या दोन स्वतंत्र गोष्टी असू शकतात, नव्हे, असतातच.. त्या दोन्ही पातळ्या अनेक अर्थानी परस्परांशी जोडलेल्या असतात आणि तरीही स्वतंत्रही असतात. जगण्यातील अनुभवातूनच कविता आपला जीवनरस घेतात, हे खरंच, पण कलाकृती बनताना त्या अनुभूती काही वेगळ्याच होतात, जणू एक नवा जन्मच घेतात.. कधीकधी असंही वाटतं, कुणाही पुरुष कवी- कलावंत व्यक्तींच्या मनोविश्वात एक अमूर्त स्त्रीरूप अखंड तरळत असतं आणि तेच त्याच्या सर्व आविष्काराची मूलभूत प्रेरणाही होत राहतं. त्याच्या वैयक्तिक जीवनात जे अविस्मरणीय आणि अनमोल असे अनुबंध येतात हे त्या प्रतिमेचेच अंश असतात. पण तरीही ती मूळ धूसर रूपप्रतिमा जराही उणावत नाही.. आणि हे सगळं स्वत: कवीच्याही नकळत घडत असतं, हे कलात्मक वास्तव समजून घेतलं तर 'कवितासखी'च्या या 'तू' कवितांचा प्रवास समजून घेणं सोपं होईल..
'दिसलीस तू फुलले ॠतू' हा या जाणिवेचा पहिला प्रकट आविष्कार होता. 'सखि, मंद झाल्या तारका. आता तरी येशील का' हे आर्त आवाहनही त्या अनामिक 'तू' साठीच होतं.. 'मन लोभले मनमोहने' ही कबुलीही त्या 'तू'लाच दिली होती.. 'पक्ष्यांचे ठसे'मधील 'एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले.' 'तुझ्यामाझ्या सहवासाचा योग..' आणि 'काय म्हणालीस, वेळ झाली आता तुला निघायला हवं..' या तीन संपूर्ण वेगळ्या भावावस्था मांडणार्या तीन कविता हे त्या 'तू' चे घेतलेले तीन अटळ निरोप होते.. 'लय' या कवितासंग्रहातील कविता या दृष्टीनं मला अधिक परिपक्व आणि त्यामुळेच जवळच्या वाटतात.
ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो जरासा,
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो, सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पाहिले.. तुझा उंबरा मागे..
तू वेध घेतला
आणि साधला नेम
त्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले एक कळेना फक्त
कां तुझ्या काळजातुनी झिरपते रक्त?
कधी गौर बसंती
कधी सावळी छाया
कधी वेल कृशांगी
कधी पुष्कळा काया
दर वळणावरती अनोळखी झालीस
मी ओळखले तू.. होय, तूच आलीस.
कधी कधी जाणवतं की जगतानाचे रोजचे वाटणारे क्षण आपल्याला एक नवी जाग देऊन जातात.. कवीला एका क्षणी खोल आत जाणवलेली एक नवी जागृती कवितेचं घेऊन आली, तीही या 'तू'ला उद्देशूनच. असंही जाणवेल की, ती त्याची स्वत:ची अनुभूती तर आहेच, पण कुणाही संवेदनाशील आणि प्रामाणिक पुरुष-मनाचं हे एकप्रकारे 'कन्फेशन आहे.'
(संपादित)
सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (८ डिसेंबर, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.