कडा रुपेरी काळोखाची
नभ गिळलेले अंधाराने
विश्व आंधळे केविलवाणे
तरीही त्याला एकच आशा, धूसर लवलवत्या क्षितिजाची
शिशिराचे साम्राज्य पसरले
हिरवेपण पुरते वठलेले
तरीही त्या वैराणी घुमते लकेर नाजुक तृणांकुराची
दु:खांना सौख्याची झालर
सुखावरी दु:खांची पाखर
उमगून घे हे खंत नको मग, घडलेल्याची ना घडल्याची
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर मोघे |
स्वर | - | मुकुंद फणसळकर |
नाटक | - | कडा रुपेरी काळोखाची |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अमा | - | अमावस्या. |
तृण | - | गवत. |
मानवी जीवनातील अशा अनेक ठळक विसंगतींवर विचार करण्याची, त्यावर मनन करण्याची (आणि अखेर त्यातून त्रस्त होण्याची) सवय मला अगदी शालेय आणि महाविद्यालयीन कालखंडापासूनच जडली होती. माझे गुरु आणि श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या 'संगीत मत्स्यगंधा' या नाटकातील 'धर्म, न्याय, नीती सारा खेळ कल्पनेचा' या गीतपंक्तीने मला पुरते बेचैन करुन टाकले होते. या कल्पनेच्या खेळामधल्या या नियमांमधली विसंगती भेदक पद्धतीने मांडणारी एखादी साहित्यकृती लघुकथा, कादंबरी अथवा नाटक, लिहिण्याचा आपणही प्रयत्न करावा या विचाराने मी झपाटून गेलो. तथापि हवे तसे कथानक मनात आकार घेईना ! दिवस उलटू लागले तसे मनातील हे वादळ शमू लागले पण मी मात्र निराशेच्या वावटळीत सापडलो !!
आणि मग अचानक १९७८ मध्ये अशा प्रकारच्या कथानकाचे बीज मला एका सत्य घटनेतून मिळाले. प्रवासात रुचिपालट म्हणून घेतलेल्या कुठल्या तरी हिंदी दैनिकातील एका बातमीने बघताबघता माझ्या मनाचा ताबा घेतला.
मध्यप्रदेशात कुठेतरी एका पुलाचे किंवा धरणाचे बांधकाम चालू होते. बांधकामाचा कॉण्ट्रॅक्टर वृद्ध, अनुभवी, सुखवस्तू आणि सरळमार्गी होता. त्याचा एकुलता एक, पण व्यसनी आणि विलासी मुलगा बांधकामावर देखरेख करीत होता. मजुरांच्या तांड्यातील एका तरुणीवर त्याची नजर पडली. आमिषे, भूलथापा यातून त्याने तिला आपल्या नादी लावले. परिणामी तिला दिवस गेले. त्यानंतर तो तिला टाळू लागला. सारी मजूरवस्ती मालकाच्या बंगल्यावर तक्रार घेऊन आली. मुलाने कानावर हात ठेवले. बापाला धक्का बसला. पुत्रमोहामुळे तो निःपक्षपाती आणि न्यायोचित भूमिका घेऊ शकला नाही. सारे मजूर निराश होऊन पण मुकाटपणे निघून गेले. रात्री बाप आणि मुलगा यांच्यात कडाक्याचा वाद झाला. तिरीमिरीने मुलगा मद्य पिऊन आणि जीप घेऊन बाहेर पडला आणि भीषण अपघातात मरण पावला. बापाच्या काळजाने ठाव सोडला. मुलाबरोबरच आपला वंशही नाहीसा झाला या कल्पनेने तो वेडापिसा झाला. अचानक त्याला त्या गर्भवती मजूर तरुणीची आठवण झाली. आता तिलाच सून मानून सन्मानानं घरी आणावं आणि आपला वंश वाचवावा म्हणून तो तिला शांधू लागला, पण त्यापूर्वीच वस्तीने वाळीत टाकल्याने त्या बिचार्या तरुणीने आत्महत्या केली होती !
बातमी एवढीच होती, पण माझ्या मनात तिने एक विशाल रूप धारण केले आणि त्यातूनच 'कडा रुपेरी काळोखाची' या माझ्या पहिल्या नाटकाचे कथानक जन्माला आले. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेत कॉण्ट्रॅक्टरचा मुलगा हा उघड उघड खलनायक होता. पण कोणीही खलनायक किंवा खलनायिका नसतानाही कधी कधी नियती किंवा परिस्थितीही ती भूमिका करू शकते, असे मला वाटले, त्यामुळे नाटकातील संघर्षाच्या दोन्ही बाजूच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती सत्प्रवृत्तच दाखवायच्या, असे ठरवूनच मी नाटकाची रचना सुरू केली. त्यापूर्वी माझ्या अनेक लघुकथा आणि काही एकांकिका नियतकालिकांतून आणि पुस्तकरुपाने प्रसिध्द झाल्या होत्या, त्यामुळे लघुकथेतील स्वातंत्र्य आणि एकांकिकेतील बंधनांचा अनुभव गांठीशी होता. नाट्यरचनेत मात्र ही बंधने फारच जाचक वाटू लागली आणि माझी लेखणी लघुकथेतील स्वातंत्र्यासाठी उताविळ होऊ लागली. नाटकाचा अडीच-तीन तासांचा कालावधी, त्यामुळे येणारी ऐंशी ते नव्वद पानांची मर्यादा, अंक, प्रवेश, ते संपतात त्या क्षणाचा 'इम्पॅक्ट' ही सारी अवधाने सांभाळताना प्रथम मी फार जेरीला आलो. पण कथेचा प्रवाह आणि तिची अखेर याबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नव्हता, त्यामुळे लागोपाठ तीन दिवस आणि तीन रात्री जागून हे तीन अंकी आणि सहा प्रवेशांचे नाटक मी झपाटल्यासारखं पूर्ण केले, शीर्षक न देता !
एक प्रथितयश वकील बॅरिस्टर गुरुनाथ उपाध्ये, त्यांची डॉक्टर पत्नी सुमती, त्यांनी लहानपणापासून मुलीसारखी सांभाळून, शिकवून सुसंस्कारित केलेली अनाथ मुलगी जानकी, डॉक्टर होऊन अमेरिकेला गेलेला त्यांचा एकुलता एक मुलगा अविनाश, त्याचा बालमित्र इन्स्पेक्टर मिलिंद आणि दयानंद महिलाश्रमाचे ऋषितुल्य संचालक भैयाजी, या प्रमुख पात्रांभोवती मी हे नाटक रचले. नाटक पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात आले की या नाटकाला दोन शेवट संभवतात. एक मी स्वतः योजिलेला शेवट होताच पण त्याच्या अगोदरही नाटकात अशी एक जागा होती की तेथेही हे नाटक संपविता येत होते.
एक शेवट गुरुनाथांच्या विशाल मानवी साक्षात्काराशी निगडीत होता तर दुसरा जानकीच्या मनस्वी, आणि निग्रही प्रतिमेशी निगडीत होता. अर्थात, नाटककाराच्या भूमिकेतून मला स्वतःला, मीच लिहिलेला शेवट अभिप्रेत होता.
व्यावसायिक मराठी रंभूमीवरील, या नाटकाचा प्रयोग 'कलाभारती' संस्थेतर्फे करण्यात आला. या नाटकाचे,
गहन अमेच्या गर्भामधुनि
चाहुल कोमल पुनवप्रभेची
कडा रुपेरी काळोखाची
हे शीर्षकगीत कविश्रेष्ठ सुधीर मोघे यांनी रचलेले होते.
'कडा रुपेरी काळोखाची' ही तेरा भागांची दूरदर्शन मालिका मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वाहिनीवरून प्रथम प्रक्षेपित झाली होती. मालिकेसाठी यापेक्षा मोठे शीर्षकगीत असावे असे वाटल्यावर तो गीतलेखनाचा प्रयत्नही मीच करण्याचे ठरवले.
घन रजनीचे अथांग सावट
उजळीत येई प्रभा उषेची
कडा रुपेरी काळोखाची
पुसुनी आंसवे पानगळीची
कोमल पर्णे तरुवर डुलती
शिशिर लोपता वसंत बहरे
अविरत भ्रमणे ही सृष्टीची
कडा रुपेरी काळोखाची
मागे फिरता लज्जित लाटा
सागर जपतो अंतरी आशा
चंद्रकोर क्षितीजावर उठता
दाविन किमया मी भरतीची
कडा रुपेरी काळोखाची
या मी रचलेल्या शीर्षकगीताने मालिकेच्या प्रत्येक भागाचा प्रारंभ झाला.
(संपादित)
सुभाष सावरकर
दि. १३ मार्च २००२
'कडा रुपेरी काळोखाची' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- सलील प्रकाशन, ठाणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.