A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी बायको हवी

अशीऽ अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी !

पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा
लाडिक अन्‌ लाघवी !

नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी-सीता
पतिपरायण सती असावी
नेत्र न जी चाळवी !
गीत - श्रीकृष्ण साक्रीकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर- पं. उदयराज गोडबोले
नाटक - अशी बायको हवी !
गीत प्रकार - नाट्यसंगीत
परायण - तत्पर / आतूर.
'अशी बायको हवी !' या नाटकाचे कथानक बर्‍याच वर्षांपासून आचार्य अत्रे यांच्या मनांत घोळत होते. १९६८ च्या डिसेंबरमध्ये ते लिहून त्यांनी पूर्ण केले. आज बरोबर एक वर्षाने ते 'रंगभूमीवर' प्रकाशित होण्याचा योग आला आहे. वरवर वाचगार्‍याला जरी हे केवळ एक प्रहसन वाटत असले, तरी देखील अत्यंत खेळकर शैलीने लिहिलेल्या या नाटकांतून एक अत्यंत सुंदर नि महान संदेश आचार्य अत्रे यांनीं दिला आहे. तो म्हणजे आण-
आयुष्याचा एकच अर्थ, प्रेमावांचून सारे व्यर्थ संबंध आयुष्यभर भल्याबुर्‍या गोष्टींचा अनुभव घेता घेता प्रत्येकाला प्रेमाच्या महत्तेची प्रचिती येतेच. या जगात प्रत्येक व्यक्तिला सहानुभूतीची आणि प्रेमाच्या ओलाव्याची किती गरज आहे, हे सांगण्याची आवश्यकताच नाही. प्रेमशून्य जीवन म्हणजे निव्वळ वनवासच होय. आजच्या या यंत्र युगांत जीवन सहारा वाळवंटाइतके निरस नि रुक्ष बनले आहे. 'नको हे जिणे' असेच प्रत्येकाला वाटते. अशावेळी आपण जर वेगळ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहिले तरच आपल्याला जगणें सुसह्य होईल.
तूं ही सुंदर मीही सुंदर
आज भासते सारे सुंदर
जग है सुंदर नभ हे सुंदर
जें जें दिसते तें तें सुंदर

या अतिसुंदर काव्यांतून आचार्य अत्रे ह्यांनीं जीवनाकडे पाहण्याची दिव्य दृष्टीच दिली आहे. हे नाटक म्हणजे सहारा वाळवंटातून क्वचित् वाहणार्‍या झर्‍याप्रमाणेच अत्यंत आल्हाददायक होईल यात तिळमात्र शंका नाहीं. 'अशी बायको हवी !' हे गीत आणि जानकीच्या तोंडी असलेले 'शिवा, हौसे, शिवा' हे मुक्तकाव्य श्री. साक्रिकर यांनीं रचलेले आहे. इतर गीतरचना आचार्य अत्रे यांचे परमस्‍नही कविवर्य श्री. सोपानदेव चौधरी यांनी केली आहे. ही सर्व गीतरचना प्रसंगानुरूप व अतिशय समर्पक अशी झाली आहे.
(संपादित)

मीना देशपांडे
'अशी बायको हवी !' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गं. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.