A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जोगिया

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरलीं पैंजणें सैल टाकुनी अंग,

दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, साली.

थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीं
तें डावलुनी तूं दार दडपिलें पाठीं.

साधतां विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान?

चित्रांत रेखितां चित्र बोललें ऐनें
"कां नीर लोचनीं आज तुझ्या ग, मैने?"

"मी देह विकुनियां मागुन घेतें मोल,
जगवितें प्राण हे ओपुनिया 'अनमोल'

रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.

शोधीत एकदां घटकेचा विश्राम
भांगेंत पेरुनी तुळस परतला श्याम,

सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लावितें पान.. तों निघून गेला खालीं.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव.
पुसलेंहि नाहीं मी मंगल त्याचें नांव;

बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळा तिथें हा इष्कां गणितों प्यार

हासून म्हणाल्यें, "दाम वाढवा थोडा
या पुन्हा, पान घ्या", निघून गेला वेडा !

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लान्‍त,

वळुनी न पाहतां कापित अंधाराला
तो तारा तुटतो, तसा खालतीं गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;

ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगें
वर्षांत एकदा असा 'जोगिया' रंगे.
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सी. रामचंद्र
स्वर- फैयाज
चित्रपट - घरकुल
गीत प्रकार - चित्रगीत, कविता
ओपणे - अर्पण करणे / विकणे.
कंचनी - कलावंतीण.
क्लांत - थकणे.
संपूर्ण कविता-

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरलीं पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरीं निळ्या दीपांत ताठली वीज
कां तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीं
तें डावलुनी तूं दार दडपिलें पाठीं.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय तें? गौर नितळ तव कंठीं-
स्वरवेल थरथरे, फूल उमलतें ओठीं.

साधतां विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान?
चित्रांत रेखितां चित्र बोललें ऐनें
"कां नीर लोचनीं आज तुझ्या ग, मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग-
हालले, साधला भावस्वरांचा योग.
घमघमे जोगिया दंवांत भिजुनी गातां
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनियां मागुन घेतें मोल,
जगवितें प्राण हे ओपुनिया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.

शोधीत एकदां घटकेचा विश्राम
भांगेंत पेरुनी तुळस परतला श्याम,
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लावितें पान.. तों निघून गेला खालीं.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव.
पुसलेंहि नाहीं मी मंगल त्याचें नांव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळा तिथें हा इष्कां गणितों प्यार
हासून म्हणाल्यें, "दाम वाढवा थोडा..
या पुन्हा, पान घ्या..", निघून गेला वेडा !

राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,
जाणिली नाहिं मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडितें अंतर आतां त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लान्‍त,
वळुनी न पाहतां कापित अंधाराला
तो तारा तुटतो, तसा खालतीं गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगें
वर्षांत एकदा असा 'जोगिया' रंगे.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.