नोंद
जगन्नाथाचा रथोत्सव
जगन्नाथपुरी या क्षेत्री जगन्नाथाच्या रथाची मिरवणूक प्रतिवर्षी निघत असते. ती मिरवणूक एक उदात्त नि विशाल प्रतीक आहे, अशी कल्पना सुचून तिचें वर्णन या कवितेत केलें आहे. यांत विश्वनियंता जगन्नाथ गतींचे अश्व जुंपलेल्या दिक्क्षितिजांच्या रथात बसून कालाच्या अतुट उतरणीवरून कुठें जात आहे, याबद्दल साश्चर्य प्रश्न केला आहे.
जाति : माळीण
चाल: हंसतमुख तरुण सारखी
युगक्रोष*- ही जगन्नाथाची मिरवणूक ज्या कालाच्या उतरणीवरून येत आहे त्या कालपथाचे युगें हेंच कोस होत ! तो सृष्टिविकासाचा रथ धडधड पुढे जातो तसा मार्गावर चुरडून उधळून गेलेल्या नक्षत्रमालिकांचा धुराळा मागे उठत आहे.
चंद्रज्योति*- दारुकामांतील श्लेषाने निरनिराळ्या सूर्यमालिकांतील चंद्र- आज प्रकाशणारे आणि कालेकरून मागमूस देखील उरू नये असे चंद्रज्योतीसारखे विझून जाणारे जे चंद्र- त्यांच्या ज्योति.
उठे चमकुनी रात्रि*- मूलरात्रिर्महारात्रिः 'आसीदिदं तमोमूढं प्रसुप्तमिव सर्वशः' किंवा भौतिकशास्त्रदृष्ट्या जडद्रव्य विकास घेता घेता त्यातच चेतना, जाणीव स्फुरू लागते. 'उठे चमकुनी' पुनः तो संघात पृथक् होतांच जाणीव, ज्योत नष्ट होऊन जड मागे उरतें.
गति* तितिकी तव- जगन्नाथाचा रथ ओढण्यास प्रत्यक्ष 'गती'च घोडा झाली आहे. मज्जापिंडातील रसांमध्ये जें स्पंदन होऊन भावभावना प्रकट होतात त्या स्पंदनापासून तों जडातील भौतिक गतीपर्यंत सर्व स्फोट- विकास- प्रगती ह्या जगन्नाथाच्या महान् मिरवणुकीस पुढे नेत आहेत.
तुझ्या परम इच्छेच्या*- घोड्याच्या वरवर स्वेच्छ दिसणार्या वेगात, धन्याच्या इच्छेप्रमाणे हलणारा लगाम गोवलेला असतो, तसा ह्या सर्व भूतमात्रांच्या, वस्तुजाताच्या वेगांत ईश्वरेच्छेचा, परमप्रवृत्तीचा रश्मि ओवलेला आहे.
खेळत हा अतली*- ज्याला तल नाही, धर नाही, अशा पथाने, निर्हेतुक, निरावलंबी, इत्यादि तात्त्विक संदर्भही या शब्दाने ध्वनित होतात.
संदर्भ-
सावरकरांची कविता
संपादक- वासुदेव गोविंद मायदेव
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई.
पृथक्
'जगन्नाथाचा रथोत्सव'- स्वा. सावरकर
एक अर्थान्वयन- रसग्रहण
(स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात जन्मठेप भोगत असतांना केलेले हे काव्य.)
ऐश्वर्ये भारी । ह्या अशा । ऐश्वर्ये भारी
महाराज, आपुली कथा ना कुठें निघे स्वारी
दिक्क्षितिजांचा दैदीप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता
युगक्रोश दूरी । मागुती । युगक्रोश दूरी
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?
पुसूं नयेचि परी । पुसतसें । पुसूं नयेचि परी
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारीं । जावया । दुज्या कुण्या द्वारीं
किंवा केवळ मिरवित येई परत निजागारीं
ह्या सूर्यशतांच्या किती मशाली जळती
मधुनीच शतावधि चंद्रज्योति ह्या उडती
सरसरत बाण हे धूमकेतुचे सुटती
कितिदां आणि तरी । हीहि तैं । कितिदां आणि तरी
उठे चमकुनी रात्रि पुरातन तिच्या अंधकारी
जीवाचीच किती । कथा ह्या । जीवाचीच किती
रथासी जगन्नाथ, तुझ्या ह्या ओढूं जे झटती
ज्वालामुखिपंक्ती- । पासुनी । ज्वालामुखिपंक्ती
- मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटिता जी जगतीं
उंचनिंच पाठीं । पुढति वा । उंचनिंच पाठीं
गति तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी
अिच्छांत आणि ह्या भूतमात्र वेगांच्या
ओंवून लगामा तुझ्या परम अिच्छेच्या
त्या अतुट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतली । रथोत्सव । खेळत हा अतली
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?
नासदासीन्नो सदासात्तदानीं नासीद्रजो नोव्योमा परोयत्।
किमावरीवः कुहकस्य शर्मन्नंभः किमासीद् गहनंगभीरम् ॥१॥
न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः।
अनीद वातं स्वधया तदेकं तस्मादधान्यन्न पर किं च नास ॥२॥
ऋग्वेद १०.१३०
तेव्हा सत् नव्हतं आणि असत्ही नव्हतं. आकाश नव्हतं आणि त्यापलिकडचे विस्तारही. काय होतं जे सर्वत्रावर झाकोळलं होतं? कुठे? कुणाच्या आश्रयाने?
गूढ गंभीर पाणी सर्वत्र हेलकावत होतं काय?
मृत्यू नव्हता म्हणून अमृतत्वही नव्हतं. न रात्र होती ना दिवस. स्वतःला जाणणारं एक वायुरहित तत्त्व प्रस्फुरत होतं. त्याशिवाय अन्य काही नव्हतं.
ऋग्वेदकाळापासून प्रतिभाशाली मनांना आकर्षित करणारं विश्वरहस्य. अंदमानात जन्मठेप भोगत असलेल्या सावरकरांना अस्तित्वाच्या त्या केंद्राकडून किती शांत प्रेरणा मिळत असल्या पाहिजेत की त्यांनी 'जगन्नाथाचा रथोत्सव' सारखं एक रूपक आपल्या प्रज्ञेने त्या निष्ठूर बंदिवासातही अंतःचक्षूंनी पाहिलं, शब्दांत साकारलं. विश्वनियंत्याला त्याच्या अगम्य अफाट रचनेबद्दल प्रश्न केले.
'जगन्नाथाचा रथ' ही आपण सामान्य व्यवहारात स्वीकारलेली एक प्रतिमा. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील एक कर्मकांड, ज्यात देवाचे विराट मंदिरसदृश तीन रथ सगळे भाविक, यात सर्व पंथमतांचे एरवी निषिद्ध मानलेले लोकही येतात, मिळून आषाढ शुद्ध द्वितियेला ओढत नेतात. कृष्ण, बलराम व सुभद्रा ही तीन भावंडे आपल्या मावशीला भेटायला दरवर्षी निघतात.. हा रथ आणि त्याचा सारथी, याबद्दल देह व बुद्धी असेही एक रूपक आधीच प्रचलित आहे. ही रथयात्रा म्हणजे रथ, त्याची चाके व तो जनसमुदायासहित भारलेला परिसर याचे एकत्व असेही मानले जाते.
मुळात ऐश्वर्य म्हणजे ईश्वराचे, ईश्वरतेने परिपूर्ण. ऐहिक अर्थाने वापरला जाणारा हा संपूर्णपणे अनीह शब्द सावरकरांनी त्याच्या उगमस्थानी नेऊन ठेवलाय. हा विश्वविस्तार, म्हणजे या कवितेतला 'जगन्नाथाचा रथ' कुठेतरी कुठूनतरी निघालाय. तो ऐश्वर्याने सहजपणे संपृक्त आहे. त्याच्या स्वामीला, जगन्नाथाला कवी विचारतोय, हे ऐश्वर्य घेऊन, या रथाचे लीलया सारथ्य करत आपण कुठे निघाला आहात?
हे प्रस्थान ठेवणं अर्थातच एका अशा प्रवासाचं आहे जिथले रस्ते दगडमातीचे नसून काळरूप आहेत. विश्व-रथाच्या मिती अर्थातच दिक्-क्षितिजांच्या आहेत. रथ पुढे जातो तेव्हा मागे चाकांखाली उडणारा धुरळा नक्षत्रकणांचा आहे- विघटन पावणार्या आकाशस्थ गोलांचा आहे. युगांचा आक्रोश, महाध्वनी मागे पडतोय. रथ पुढेच जातोय अलिप्तपणे.
दुसर्या कडव्यात कवी न राहवून विचारतोय- प्रवासाला निघाले असताना 'कुठे' म्हणून विचारू नये असा एक संकेत आहे . इथे तर ज्याला छेडायचे तो विश्वनियंता आहे, तरीही ही ब्रह्मजिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही. 'कोठे जाण्यासाठी हा खटाटोप? दुसर्या कुण्या दारात (जसे की मूळ रथयात्रा कृष्णांच्या मावशीकडे जाऊन परत येते ), की केवळ हे 'ऐश्वर्य विस्तारवून मिरवून परतच यायचेय मूळ केंद्रबिंदूपाशी?'
एका जुन्या राजस्थानी स्त्रीगीताची अभावित आठवण झाली.. 'बाजारात जायचंय ते खरेदी-सौद्यासाठी नाहीच, थोडी माझ्या काजळाची चमक अन कंकणांची लखलख सगळ्यांना दाखवून परत यायचेय ग सखे !', असं म्हणणार्या त्या स्त्रीसारखं देवाला नुसतं फिरून यायचंय बस्स. ऐश्वर्य मिरवीत !
हे मिरवणं कसं? तर -
रथयात्रेत 'शतसूर्यांच्या'- सावरकरांचा आवडता शब्द- मशाली जळताहेत, चंद्रांसारख्या छोट्या उपग्रहांच्या नयनमनोहर 'चंद्रज्योती' जळताहेत. धूमकेतूंचे बाण सरसरत आहेत. अशी भव्य रोषणाई आकाशमंडळात रथाच्या पथावर चाललीय. त्यामुळे तेथील पुरातन रात्रीचा अंधकार उजळून निघतोय..
हा 'पुरातन रात्र' शब्दप्रयोग पुनः पुरातन सूक्तांची आठवण करून देणारा.. अनादि अनंतात चाललेल्या महानाट्याची जाणीव करून देणारा.
'मूलरात्रिर्महारात्रि' असाही एक संदर्भ आहे, जो नीटसा मिळाला नाही, ज्यात वस्तुसंघातामध्ये चेतन होणारी जाणीव व तो वस्तुसंघात विघटन होताना ती जाणीव मालवून जडद्रव्य मागे उरणे असा तम-प्रकाशाचा विरोधविकास वर्णिला आहे. इथे तोही संदर्भ असू शकतो..
या रथयात्रेत सामील झालेल्या जीवसृष्टीच्या कौतुकाकडे आता सावरकर अवधान देत आहेत. त्या जीवांच्याच किती कथा, किती परि सांगाव्यात ! या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी प्रत्यक्ष गतीच घोडा झाली आहे. 'गती तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी..' ही गती कोणती? तर ही गती एकीकडे ज्वालामुखीमध्ये लाव्ह्याच्या अमानवीय ऊर्जेने धगधगणारी, जडातील ऊर्जा दर्शवणारी तर दुसरीकडे सचेतनांच्या मज्जापिंडांमध्ये संचरणारी दैवी प्राणशक्ती कुंडलिनी.. अशी चोहीकडून उंचसखोल व्याप्तीची चेतना, विश्वाची गती.. हीच जणू अश्वरूप घेऊन तुझा रथ ओढत आहे.
या गतीच्या भूतमात्रांच्या प्रच्छन्न इच्छांच्या अनावर वाटणार्या आवेगांमध्ये एका लगामाची वेसण आहेच. तुझ्या परम इच्छेची गच्च वेसण. त्याने तू हा प्रचंड शक्तीशाली अश्व नियंत्रणात ठेवला आहेस.
ही गती अशी सजीव भूतमात्रांच्या मनःपूत स्वैर इच्छांमधून प्रकट होते तेव्हा त्या गतीरूप अश्वांना जुंपलेला रथ उधळून कसा जात नाही? या जीवमात्रांच्या इच्छा तर स्वतंत्र, परस्परविरोधी दिशांना वार्यासारख्या धावणार्या आहेत. पण सावरकर सांगताहेत की तसे होत नाही, कारण, या इच्छारूप अश्वांच्या नाकात परमेश्वराच्या परम-इच्छेची वेसण - लगाम आहे. हा अस्ताव्यस्त अनियंत्रित वाटणारा खेळ कुणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे. म्हणून तर आपण 'ईश्वरेच्छा बलियसि', असे म्हणतो !
पुनः एकदा सावरकर म्हणताहेत, काळाच्या न संपणार्या उतरणीवर ('अ-तली' म्हणजे कोणत्याही तळावर- भूमीतळावर नाही अशा अर्थाने) हा तुझा रथ यात्रेचा खेळ चालला आहे. ही तुझी हेतूरहित लीला विलसतेय. ''रथोत्सव । खेळत हा अतलीं''- स्वतःच्या प्रश्नाला असं स्वतःच स्वातंत्र्यवीरांनी उत्तर दिलेय.. कसा नि कुठे निघालाय हा रथ अन् नियंत्याची अद्भुत स्वारी? तर कुठेही नाही.. हा तर खेळ आहे. आनंद आहे.
अशा तर्हेने ग्रहगोल, शतसूर्यमालिकांच्या दीपावली सामावून घेणारे हे विश्व, यातील गतीमानतेचे स्त्रोत, त्यांचं अनाकलनीय प्रयोजन ..सावरकरांच्या निरंतर जिव्हाळ्याच्या विषयावरील ही कविता.
स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या जीवनाचा होम करणारी ही माणसे किती पांडित्य-प्रतिभा पूर्ण होती हे नव्याने काय सांगायचे ! पण आपण विसरतोही खूपच लवकर हल्ली म्हणून आठवण द्यायची तर हिंदुधर्माच्या सनातनत्वाचा बोजा करून न घेता त्यातील फोल निर्ममतेने काढून सत्त्वाचा अभ्यास व आग्रह धरणार्या सावरकरांमध्ये टिळक व आगरकर दोघेही एकवटलेले मला भासतात.
शेवटी , या सुंदर रूपकाचं हे यथाशक्ति-मती अर्थान्वयन-रसग्रहण संपवताना, का कोण जाणे मला नासदीय सूक्तच पुनः आठवतेय..
सुरुवातीला एका परम इच्छेचे बीज अवतरले, ते आदिबीज. नियंत्याचा मूळ आसक्ती-संकल्प. कवी ज्याचा शोध हृदयातून घेतात.(कवीला जे भावते त्याचा शोध शास्त्रज्ञ कमी आकर्षक पद्धतीने लावतात, असं बंगालचे परमहंस योगानंद गमतीने म्हणालेत ते स्मरलं, अर्थात इथे हे कवी म्हणजे सत् मध्ये ज्यांची प्रज्ञा तपश्चर्येने स्थिरावली आहे असे द्रष्टे.. सावरकरांसारखे.)
काय सांगावे हे सारे कुठून आले.. देवही जन्मले नव्हते त्याआधीचे हे प्रस्फुरण.. जेथून हे स्फुरले त्या व्योमांपलिकडच्या परम 'अध्यक्षाला'च माहीत की त्यालाही नसेल माहीत ??!!
(संपादित)
भारती बिर्जे डिग्गीकर
सौजन्य- maayboli.com
(Referenced page was accessed on 18 April 2024)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख