A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेथें जातों तेथें तूं माझा

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरुनियां ॥१॥

चालों वाटे आह्मीं तुझाचि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥२॥

बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥३॥

अवघें जन मज जाले लोकपाळ ।
सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥

तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें ।
जालें तुझें सुख अंतर्बाहीं