A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं, नीति-संपदांची
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशीं होशी
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती । तूंच जी विलसतसे लाली
तूं सूर्याचें तेज, उदधिचें गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्‍नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होतें
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्त-रंजिते । सुजन-पूजिते । श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन । तुजवीण जनन तें मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यवीर सावरकर