A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जय रमारमण श्रीरंग

जय जय रमारमण श्रीरंग !

पदारविंदीं सदा रमावा
माझा मानस-भृंग !

त्रिभुवन-सुंदर रूप देखुनी
लज्जित होय अनंग !

संतजनांच्या कीर्तन-रंगी
रंगनाथ हो दंग !

तो करुणाकर, तो कमलाकर
जलधर-श्यामल-अंग !

भक्त-चातकां मुदित करितसे
दुरित-दैन्य-भय-भंग !
अनंग - मदन.
अरविंद - कमळ.
चातक - एक पक्षी. प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. इतर पक्ष्यांप्रमाणेच चातक जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो.
दुरित - पाप.
मुदित - हर्षभरित, आनंदित.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
रमण - पती.
रमा - लक्ष्मी.
धत्तूर- पुष्प

धोतर्‍याची महादेवां फुलांत रुचलीं फुलें
गुणांधत्वहि मोठ्यांचें मोठेंचि असणे बरें !
- स्वातंत्र्यवीर सावरकर

धोतर्‍याची फुले !
त्यांना ना रूप ना गंध. पण भोळ्या शंकराला, महान्‌ देवाला, तीच आवडली ! उदारचरित्र महाभागांची ही थोर गुणांधता, त्यांना शोभूनच दिसते. आमच्या दिलदार रसिक प्रेक्षकांचेहि असेंच आहे. या रसिक शंकराला 'पंडितराज जगन्‍नाथ' 'सुवर्णतुला' 'मंदार-माला' 'मदनाची मंजिरी' इत्यादि माझी नाटकें आवडली. त्यांना उदार आश्रय त्याने दिला.

आज मला अत्यंत आनंद होत आहे कीं, आणखी एक ताजें धत्तूरपुष्प ( जय जय गौरी-शंकर ) मी रसिक-शंकराला अर्पण करीत आहे.

हें माझें आठवें नाटक. संगीत नाटकांपैकी ५ वें. पंचवदन महादेवाची एक मनोहर लीला कथन करणारे हें पांचवें नाटकहि त्याला रुचेल, अशी आशा वाटते. त्यांत कांहीं न्यून असले तरी ते तो औदार्याने पूर्ण करून घेईल अशी खात्री आहे !

प्रस्तुत नाटक मुख्यतः शिवलीलामृतांतील १४ व्या अध्यायांतील शंकर-शबरी कथेवर आधारलेले असून, त्याला स्कंदपुराणांतर्गत सह्याद्रि खंडांतील 'मांगीश महात्म्यां'तील कथाभागाची जोड दिली आहे. संतकवि श्री दासगणूकृत 'शंभू महादेव अथवा श्री मांगीश महात्म्यसारामृत' या पोथीचाहि मला उपयोग झाला आहे.

माझीं कुलदैवतें शंकर-कुळातीलच आहेत. आमच्या घराण्याच्या आदिपुरुषाचे नांव शंभू (संभाजी) राव. वडिलांचे नांवहि तेच. म्हणूनच की काय माझ्याकडून ह्या ना त्याप्रकारें श्रीशंकराचा व त्याच्या कुळांतील देवतांचा महिमा गाईला गेला. 'कुमारसंभवां'तील महत्त्वाच्या सर्गाचें भाषांतर माझ्याकडून झाले. सर्व संगीत नाटकांतून फूल ना फुलाची पाकळी महादेवाला वाहिली. पहाना- 'पंडितराज जगन्‍नाथांत त्याला शिरोधार्य असलेला गंगेचा पावन हेमा रेखाटण्यांत आला. 'सुवर्णतुला' हें वस्तुतः श्रीकृष्ण-कथेचें नाटक. त्यांतहि सत्यभामेच्या मुखांतून 'जय जय गिरिशा गिरिजा वरा' हें भजन फिट झालें. शंकर-पूजनाचा प्रसंग रंगभूमिवर आला ! 'मंदार-माले'तहि डमरूचा घोष दुमदुमला. 'मदनाच्या मंजरी'त 'तारिल तुज अंबिका' आश्वासन मिळाले.. 'जय गंगे भागीरथी' आणि 'जय शंकरा गंगाधरा' ह्या माझ्या गीतांनी अलीकडील लोकप्रियतेचा उच्चांक मोडला. अशी आजवर श्री शंकरांची व त्याच्या कुळांतील देवतांचीं, यथाशक्ति ही वांकुडी कां होईना, सेवा घडली.

पुनश्च-

वरील प्रस्तावनेंतील ऋण-निर्देशांत कै. पां. गो. गुरव यवतेश्वरकर ह्यांनी १९८० सालीं लिहिलेल्या 'अक्षविपाक अर्थात् संगीत द्यूतविनोद' या नाटकाचा उल्लेख घाई गर्दीत राहून गेला. (हें नाटकहि शिवलीलामृतांतील १४ व्या अध्यायाच्या आधारेंच लिहिलें गेलें आहे.)

त्या नाटकांतील द्यूत-क्रीडा प्रसंगांतील कांही तांत्रिक संज्ञा, ७-८ वाक्यें व अन्य २-३ कोट्या मला गौरी-शंकरांत उपयोगी पडल्या आहेत. इतर पूर्वसूरींप्रमाणेंच कै. यवतेश्वरकर ह्यांचाहि मी ऋणी आहे. एकेकाळीं, केशवराव भोसल्यांच्या कारकीर्दीत उपर्युक्त नाटक १९०९ ते ११ च्या सुमारास 'ललितकलादर्श' करीत असे. त्याच संस्थेतर्फे त्याच विषयावरील नाटक अर्ध्या शतकानंतर रंगभूमीवर येणें, हा परंपरेचा धागा अविच्छिन्‍न राखणारा शुभसूचक योग मानला पाहिजे !
(संपादित)

विद्याधर गोखले
दि. १४ ऑगस्‍ट १९६६
'जय जय गौरी-शंकर' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद सरस्वती प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.