A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयदेव जय शिवराया

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया

श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांहीं छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया

त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया