A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जपत किनारा शीड सोडणे

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर !
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर !

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा !
वेळ पाहुनी खेळ मांडणे - नामंजूर !

माझ्या हाती विनाश माझा ! कारण मी !
मोहासाठी देह ठेवतो तारण मी !
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर !

रुसवेफुगवे भांडणतंटे लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर !

मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन्‌ उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती-तत्त्वे फसवी गणिते ! दूर बरी !
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी !
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे - नामंजूर !
गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - नामंजूर
गीत प्रकार - कविता
आदिम - आरंभीचा / सुरुवातीचा.
कळा - युक्‍ती, कौशल्य.
तारण - अनामत / गहाण ठेवलेली वस्तू.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सलील कुलकर्णी, संदीप खरे