A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगी ज्यास कोणी नाही

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे

बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे

भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने
नारसिंहरूपे त्याला रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मूर्ती अजुनी विश्व पाहे

साधुसंत कबिराला त्या छळिती लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे
प्रह्लाद - हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले.
​​ज्यावेळी माझी रेडिओवरची कामं जोरात चालायची तो काळ मला आठवतोय. त्यावेळी टी.व्ही. चं राज्य सुरू झालं नव्हतं. टेलिव्हीजन नसल्याने रेडिओला फार महत्त्व होतं. रेडिओवर भरपूर कामं ​​असायची. मी गाण्यांना संगीत देत होतो, स्वतः गात होतो, त्यामुळे आकाशवाणीत व स्टुडिओत जवळजवळ दररोज चक्कर असायचीच. त्यावेळी यशवंत देव हे प्रोड्युसर होते. त्यांचा व माझा चांगलाच सूर जुळला. अतिशय उत्साही व कल्पक असे अधिकारी म्हणून ते आकाशवाणीला लाभले. हे जनतेचे भाग्यच म्हणायला हवे. त्यांच्यामुळे रेडिओवर निरनिराळ्या प्रकारची गाणी श्रोत्यांना ऐकायला मिळायची. त्यात समरगीते, द्वंद्वगीते, मासिक गीत, भावसरगम अशी अनेक प्रकारची रेकॉर्डिंग चालत. त्यांचा माझ्यावर फार विश्वास होता. ते मला सांगायचे "पुजारी, उद्या या गाण्याचं रेकॉर्डिंग करायचंय. तर हे काव्य घ्या. फार चांगलं काव्य आहे. याला चाल लावा. उद्या रेकॉर्डिंग करू." मी दुसर्‍या दिवशी त्या गाण्याला चाल लावून देवांच्या ऑफिसमध्ये हजरं होत असे अन् त्यांना सांगत असे की, चाल तयार आहे. आर्टिस्ट कोण आहे ते सांगा. मी त्यांच्याकडून गाणं बसवून घेतो." ते म्हणत, "बाजूच्या रूममध्ये आर्टिस्ट बसलेले आहेत. तुमचं काम चालूद्यात." मग मी गायक व वादकांकडून ते गाणं बसवून घेई. पण कधीही ते मला असं म्हणाले नाहीत की, चाल कशी काय बसवली आहे ते मला ऐकवा, मला ते बघायचंय. एक दिवस गमतीनेच मी त्यांना म्हणालो "देवा! माझी चाल ऐका. तर ते हसून म्हणाले "तुमची चाल काय ऐकायची? आम्ही दुसर्‍यांच्या चाली ऐकून घेतो व पास करतो. तुम्ही सरळ गायकाकडून बसवून घ्या व रेकॉर्डिंग करून घ्या. चाल ऐकायची गरज नाही. ती चांगलीच असणार!” असे त्यांचे व माझे संबंध.

त्यांच्यात चांगला गुणधर्म काय तर ते उत्तम गुणग्राहक आहेत. संगीतकार काय किंवा गायक, वादक काय; त्यांच्यात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत याची त्यांना जाणीव असे व त्याचा ते व्यवस्थित उपयोग करून घेत. त्यांचा स्वभाव तर फारच प्रेमळ, सतत हसतमुख. मजेमजेदार गोष्टी सांगायचे. त्यांच्या संगतीतला काळ म्हणजे आनंदाची पर्वणीच वाटे अगदी शांतपणे ते सर्वांची गाणी ऐकायचे. जोपर्यंत यशवंत देव रेडिओवर होते तोपर्यंत सर्वांनाच चांगले रिझल्टस मिळत गेले. उत्तमोत्तम अशी गाणी त्यांनी रेडिओकरता बसवली व ती खूपच लोकप्रिय झाली. अजूनही ती ऐकायला चांगली वाटतात. ते देव व मी पुजारी असं एक अतूट नातं निर्माण झालं होतं व अजून टिकून आहे.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.