A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही वाट कुणी मंतरली

ही वाट कुणी मंतरली, जग झाले बघ झुलणारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे?

पाकळी पाकळी जपली, पर्णामागे जी लपली
ती मूक व्यथा बकुळीची रे आज पुन्हा दरवळली
गंधांचे घेउनी गुज का अगतिक झाले वारे?

का पंख नवे घेउनिया क्षण आज पुन्हा पालवले
घरट्याच्या व्याकुळ अधरी ते गीत पुन्हा अंकुरले
मनवासी ते वेल्हाळ, पाखरू परतले का रे?

जे बोलु नये शब्दांनी, जे दावु नये डोळ्यांनी
ही सांज उजळली मितवा त्या अरूप आनंदांनी
लाटेवर वाहुन नेऊ क्षितिजाचे सर्व किनारे