A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हें कोण बोललें बोला

हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला !'

दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होई -
हें कुणी कुणां सांगावें !
आईच्या हृदया ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें -
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला !'

या अर्ध्या उघड्या नयनीं । बाळ काय पाहत नाहीं?
या अर्ध्या मिटल्या तोंडी । बाळ काय बोलत नाहीं?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हसें मुखावर नाचे !
जणुं बोल दुग्धपानाचे !
कीं मुक्या समाधानाचे !
इतुकेंहि कळे न कुणाला । 'राजहंस माझा निजला !'