A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घनश्याम सुंदरा श्रीधरा

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लौकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनू हंबरती
लक्षिताति वांसुरें हरी धेनुस्तनपानाला

सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षीं
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
आनंदकंद - आनंदाचा उगम.
उदयाचल - ज्याच्या आडून चंद्रसूर्याचा उदय झालेला दिसतो तो पर्वत.
क्षीर - दूध.
कापडी - खांद्यावर कावड घेऊन तीर्थयात्रा करीत फिरणारा मनुष्य.
कावड - जड पदार्थ नेण्यासाठी आडव्या बांबूच्या दोन टोकांस दोन दोर्‍या बांधून त्याला ओझी अडकवण्याची केलेली व्यवस्था.
दध्योदन - दहीभात.
द्विज - ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य / पक्षी.
धेनु - गाय.
मित्र - सूर्य.
मूळ रचना

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लौकर वनमाळी उदयाचळीं मित्र आला

सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षी
अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षीं
मुक्तता होउं पाहेकमळिणिपासुनि भ्रमरा
पूर्व दिशें मुख धुतलेंहोतसे नाश तिमिरा
उठिं लौकरि गोविंदासांवळ्या नंदकुमारा
मुखप्रक्षाळण करीं अंगिकारीं भाकरकाला
उठिं लौकर वनमाळी उदयाचळीं मित्र आला

घरोघरीं दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती
गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती
प्रवर्तोनि गृहकामीं रंगावळी घालुं पाहती
आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती
काढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनू हंबरती
द्वारिं उभे गोपाळ हाक मारूनि तुज बाहती
हे मुक्तहारकंठींघालिं या रत्‍नमाळा
हातिं वेत्रयष्टि बरवीकांबळा घेई काळा
ममात्मजा मधुसूदनाहृषिकेशि जगत्‍पाळा
लक्षिताति वांसुरें हरी धेनुस्तनपानाला
उठिं लौकर वनमाळी उदयाचळीं मित्र आला

प्रात:स्‍नानें करुनि गोपिका अलंकारें नटती
कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती
प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती
अर्घ्यदान देउनिया द्विजगण देवार्चन करिती
नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णूपूजा समर्पिती
स्मार्त शिवार्चनसक्त शक्तितें शाक्तहि आराधिती
ऋषिगण आश्रमवासीजे निरंजनीं धाले
अरुणोदयिं अपुलालेध्यानीं निमग्‍न झाले
पंचपंच उष:कालींरविचक्र निघों आलें
एवढा वेळ निजलासि म्हणुनि समजेल नंदाला
उठिं लौकर वनमाळी उदयाचळीं मित्र आला

विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायीं
अध्यापन गुरु करिती शिष्यहि अध्ययना उदयीं
याज्ञिकजन कुंडामधिं आहुति टाकितात पाहीं
रविप्रभा पडुनिया उजळल्या शुद्ध दिशा दाही
हे माझे पाडसे सांवळे उठ कृष्णाबाई
सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई
मुनिजनमानसहंसाश्रीमन:कमलभृंगा
मुरहर पंकजपाणीपद्मनाभ श्रीरंगा
शकटांतक सर्वेशाहे हरि प्रतापतुंगा
कोटी रवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजीबाळा हा नित्य ध्यातसे हृदयिं नाममाळा

संदर्भ-
म. वा. धोंड
मर्‍हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पंडितराव नगरकर, लता मंगेशकर