एकतारी सूर जाणी श्रीहरी जय श्रीहरी
तू सखा तू पाठिराखा तूच माझा ईश्वर
राहिलासी व्यापुनीया तूच माझे अंतर
आळविते नाम ज्याला अमृताची माधुरी
पाहते मी सर्व ते ते कृष्णरूपी भासते
आणि स्वप्नी माधवाच्या संगती मी नाचते
ध्यानरंगी रंगताना ऐकते मी बासरी
तारिलेसी तू कन्हैया दीनवाणे बापुडे
हीन मीरा त्याहूनीही, भाव भोळेभाबडे
दे सहारा दे निवारा या भवाच्या संगरी
गीत | - | यशोदकुमार गवळणकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
भव | - | संसार. |
वैखरी | - | वाणी, भाषा. |
संगर | - | युद्ध. |
कृष्णगाथा एक गाणे जाणते ही वैखरी
एकतारी सूर जाणी श्रीहरी जय श्रीहरी
मला या योगायोगाचं आश्चर्यच वाटलं. अर्थात मी ते मुद्दाम केलं असं नाही पण माझ्याकडे तशीच गाणी येत गेली. 'नेऊ नको माधवा, अक्रुरा', 'केशवा, माधवा', 'पैंजण रुमझुमले', 'चल उठ रे मुकुंदा', इतकंच काय, पण संतांचे जे अभंग म्हंटले त्यातले बरेचसे कृष्णावरच होते. त्यामुळे यशोदकुमारने जेव्हा ते काव्य वाचून दाखवलं तेव्हा मला एकदम हसूच आलं. डॉक्टरांना असं वाटलं की त्यांचं काहीतरी चुकलंय म्हणून मी हसतोय.
त्यांनी विचारलं, "का हो? काही चुकतंय का?" मी म्हंटलं, "नाही बाबा, चुकलंबिकलं काही नाही. पण योग कसा आहे पहा, तुम्ही सुद्धा मला कॄष्णाचंच गीत ऐकवता आहात. त्याचंच मला हसू आलं. तरीसुद्धा हरकत नाही. हे गाणं मला आवडलंय् व मी त्याचं रेकॉर्डिंग करणार." नंतर सुमनताईंच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं व त्यांनी फार सुंदर गायलंय. अजूनही जेव्हा मी ते गाणं ऐकतो तेव्हा मला ते आवडतं. त्यानंतर त्यांचं आणखी एक चांगलं गाणं म्हणजे-
क्षणी या दुभंगुनिया घेई कुशीत माते
अश्राप भूमिकन्या तुज आज आळविते
त्यानंतर मात्र माझी व त्यांची भेट झाली नाही. डॉक्टरांनी त्यांची जागा सोडली. ते कुठे गेले हेही कळलं नाही. त्यांची आठवण मात्र कायम येत असते.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.