प्राण हा सर्वथा जाऊं पाहे
हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें
मजलागी जाहलें तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धांवे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
गीत | - | संत कान्होपात्रा |
संगीत | - | आनंदघन |
स्वराविष्कार | - | ∙ पं. हृदयनाथ मंगेशकर ∙ संजीव चिम्मलगी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | साधी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, संतवाणी |
टीप - • स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- आनंदघन • स्वर- संजीव चिम्मलगी, संगीत- कौशल इनामदार. |
मोकलणे | - | पाठविणे / मोकळा सोडणे. |
महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा लाभल्यामुळेच इथल्या लोकसंस्कृतीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक विचारांचा वसा-वारसा मिळाला. पुढच्या पिढ्यांच्या जडणघडणीवर त्याचा परिणाम होताना दिसतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताई आदी संतकवींनी भागवत संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीची रुजवणूक करताना आपले आयुष्य पणाला लावले. त्याच परंपरेतील एक महत्त्वाची कवयित्री संत कान्होपात्रा.
पंढरपूरपासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर असणार्या मंगळवेढे या गावी श्यामा नायकिणीच्या पोटी शके १३९० च्या कालखंडात कान्होपात्रेचा जन्म झाला. अत्यंत देखणी कान्होपात्रा स्वत:विषयी, आईविषयी, समाजाविषयी अनेक प्रश्न मनात घेऊन लहानाची मोठी होत होती. संवेदनशील कान्होपात्रा जेव्हा ऐन तारुण्यात भक्तिरसात बुडून पांडुरंगचरणी सर्वस्व अर्पण करते व आईच्या पारंपरिक देहविक्रयाच्या व्यवसायाला नकार देते, तेव्हा जणू एक प्रकारे तिची लालसा धरून असलेल्या अनेक लब्धप्रतिष्ठित म्हणवल्या जाणार्यांच्या विरोधात ती विद्रोह मांडते. हीन कुळात जन्माला आल्यामुळे व त्यात पुन्हा सुंदर असल्यामुळे पवित्र राहण्याचा कितीही प्रामाणिक प्रयत्न केला तरी समाजाने तिचे सन्मानाचे जिणे नाकारल्याची सुईबोचरी वेदना तिला नेहमीच व्याकूळ करत राहिली. या दु:खार्त भावनेचा उत्कट आविष्कार तिच्या अभंगरचनेतून पदोपदी जाणवत राहतो. कवितेला अनुभवाचाच शब्द लागतो आणि तो तिच्याकडे होता. नामदेवाची उत्कट अभंगवाणी आपल्या गोड गळ्यातून गाताना ती देहभान हरपून जात असे. त्यामुळे कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या तिच्या अभंगांतून अस्वस्थ आणि उद्विग्न मनाचे दर्शन घडते. हळव्या वयाच्या तारुण्यसुलभ भावनेतून पांडुरंगाबद्दल वाटणार्या प्रेम, जिव्हाळा आणि असीम भक्ती यातून तोच तिचा सखा सर्वेश्वर होऊन बसतो. दीन-दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ अशी त्याची ख्याती असल्यामुळे या हीनत्वाच्या दलदलीतून तोच आपली सुटका करील, असा तिचा विश्वास वाटू लागतो. 'आधी भक्त मग देव' या तत्त्वप्रणालीप्रमाणे भक्ती ही कान्होपात्राची जीवननिष्ठा बनली होती. कान्होपात्रेच्या अभंगातून तिच्या दु:खभोगाचे प्रतिबिंब उमटताना दिसते. कान्होपात्रेच्या अभंगाचा उगमच मुळात द्विविध स्वरूपाचा असून जितका उत्कट तितकाच सहजभाव दाखवणारा आहे.
दिवसेंदिवस तिच्या सौंदर्याच्या लालसेतून आक्रमक होत जाणार्या मनोवृत्तीमुळे तिचे निर्मळ मन गढूळ होण्याच्या भीतीने धास्तावून जाते.
'पुरविली पाठ न सोडी खळ,
अधम चांडाळ पापराशी'
या अस्वस्थ मनोवस्थेतून ती पांडुरंगाला वारंवार साकडे घालते तर कधी उद्विग्न होऊन अभंगातून त्याच्याशी भांडत राहते.
'वायांच म्यां देवा धरिली आवडी, न पावे थोडी काही केल्या'
आजूबाजूच्या समाजाशी स्वत्त्व जपण्यासाठीचा संघर्ष करत भक्तिरसात तल्लीन असताना तिच्या रूपसौंदर्याचा बोलबाला सर्वदूर झालेला असतो. त्याचा परिणाम म्हणजे बादशहाचे दूत तिचे घर पुसत तिच्या दाराशी येऊन पोहोचतात. तेव्हा तिच्या आंतरिक वेदनेचा कडेलोट होतो. जेव्हा रक्षकच भक्षक होतात तेव्हा न्याय तरी कुठे मागावा? तेव्हा दूताजवळ थोडी वेळेची मुदत मागून ती पंढरपूरच्या पांडुरंगासमोर उभी राहते व आपल्या शीलाच्या जपवणुकीसाठी करुण विनवणी करताना तिच्या आर्त व्याकूळ वेदनेला प्रतिभेचा सुगंध प्राप्त होतो.
नको देवराया अंत आता पाहूं, प्राण हा सर्वथा फुटो पाहे ॥
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेलें, मजलागी जाहले तैसे देवा ॥
या अभंगात कान्होपात्रेची अगतिकता शब्द-शब्दातून पाझरते व तिची करुण मूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. एखाद्या सामर्थ्यशाली शक्तीने दुबळ्या जीवावर प्राणघातक हल्ला करावा. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या जाणिवेतून होणारी प्राणांतिक तडफड कासावीस करणारी असते. अगदी त्याचप्रमाणे 'प्राण हा सर्वथा फुटो पाहे' ही तडफड, ही हतबलता इथं व्यक्त होते. काही केल्या पांडुरंग आपल्या मदतीला धावून येत नाही हे जाणवल्याने एक प्रकारची उदासी तिच्या मनाला येते आणि मग शरीराची विटंबना होऊन मरण्यापेक्षा आधीच आत्मत्याग केलेला काय वाईट, असं म्हणत 'तू आता मला तुझ्यातच सामावून घे' ही आत्मसमर्पणाची समंजस भूमिका ती घेते. तीच पुढे कान्होपात्रेला अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ उंची मिळवून देते.
आपल्या जगण्याला नितळ-निर्मळ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी कान्होपात्रा तिच्या जीवनचरित्रातून आणि निवडक २३ अभंगांतून समाजापुढे संवेदनशील प्रश्न उपस्थित करत राहते.
(संपादित)
डॉ संजीवनी तडेगावकर
सौजन्य- दै. दिव्य मराठी (१८ जानेवारी, २०१३)
(Referenced page was accessed on 22 September 2018)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.