घनदाट दाटली विषण्णतेची छाया
तडफडे जिवाचें पांखरुं केविलवाणें
होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें
जोडीस शोधीतें उदात्त अपुल्यावाणी
प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी
गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणे
गुरफटुन त्यांत जिवाला । टाकणें
रंगीत स्वप्नसृष्टीला उठविणें
ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेड्या
ही सुवर्णलंका दीपवित अवघी हृदया
परि इंद्रजाल हें जात जधीं विरुनियां
एकलेपणाची आग लागते हृदया !
गीत | - | अनंत काणेकर |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | आंधळ्यांची शाळा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
'एकलेपणाची आग लागली हृदया' हे मिश्र पिलु रागातील भावगीत 'चंद्रकांत राजाची कन्या' या चालीवर रचलेले आहे. काणेकरही त्याच चालीत म्हणत असत. परंतु नाटकात ती चाल फारच हास्यास्पद ठरली असती. म्हणून मला नाटकातील 'मनोहर' या पात्राच्या एकलेपणाच्या वाढत्या तीव्रतेला पोषक ठरेल अशी चाल रचायची होती. त्याला जरा उशीर लागला. एकदा मुखडा सुचल्यावर भावगीताच्या चालीची वाटचाल फारच रसपूर्ण व सरळ होत गेली. ते बसवताना तर मला आणखीही पोषक जागा सुचत गेल्या. दोनअडीच तासांत हे भावगीत छान बसले.
'आंधळ्यांची शाळा'नंतर सर्वस्वी कलापूर्ण संगीत रचण्याची संधी मला मिळालीच नाही. पुढील नाटककारांनी पदांची संख्या बेताचीच ठेवली - शक्य तितके कथाविकास रोखून धरणारे संगीत त्यांनी घातले नाही, हे योग्यच केले. धंदा सांभाळून शक्य तेवढी कलासाधना ते करीतच होते.
प्रेक्षकांना मात्र स्वत:चे धोरण एकच माहीत होते; ते म्हणजे भरपूर गाणे ऐकण्याचे. नाही तर 'एकच प्याला', 'मानापमान', 'स्वयंवर' या नाटकांचे प्रयोग झालेच नसते. रंगभूमीची प्रगती थांबवून धरण्यात संगीतलोलुप मराठी प्रेक्षकांनी - वरचेवर वन्समोअर देणार्या प्रेक्षकांनी - फार मोठा भाग घेतला, हे ऐतिहासिक सत्य आहे. मराठी रंगभूमीवर नाट्याभिनयाचा विकास गद्य नाटक कंपन्या, त्यांचे नाटककार, सुधारणेच्छु रसिक, प्रयोगशील व कल्पक दिग्दर्शक यांनी केला. त्यांचे चीज काही प्रमाणात या प्रेक्षकांनी केले, पण संगीत कंपन्यांइतके नाही. खाडिलकरांसारखे मोठे नाटककारही या संगीताला बळी पडले, त्यापुढे इतर नाटककारांची मातब्बरी ती काय? १९३५ नंतरच्या नाटककारांनीच संगीताला आवरून धरले आणि नाटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला, हे त्यांना भूषणावह आहे.
(संपादित)
केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.