A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्‍नाप्रमाणे भासेल सारे
जातील सार्‍या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी
या वाहणार्‍या गाण्यांतुनी
लहरेन मी, बहरेन मी
शिशिरांतुनी उगवेन मी
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - पुढचं पाऊल (१९८६)
राग - भैरवी
गीत प्रकार - चित्रगीत
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
गाणी जन्म घेत असताना त्यांची कुंडली कुणालाच मांडता येत नाही. लोकप्रियतेच्या बाबतीत 'शापित' मधल्या 'दिस जातील, दिस येतील..' ह्या गाण्यालाही मागे सारेल असं एक गाणं 'पुढचं पाऊल' या चित्रपटात यायचं होतं.

कजाग सासू आणि सहानुभूतिशून्य नवरा ह्यांच्या धास्तीखाली जगणारी नायिका व एरवी तिच्याविषयी एक मूक आत्मभाव बाळगणारा मुखदुर्बळ सासरा.. ज्याच्यामुळे कधीही न मिळालेली एक गोडव्याची वागणूक नायिकेला मिळू लागते. सासरा एके दिवशी काश्मीरच्या सहलीला जायचा त्याचा पूर्वनियोजित बेत पक्का करतो.. मुलगी व्याकूळ होऊन सांगते, "अण्णा, मला ह्या घरात भीती वाटते. तुम्ही नसताना काय होईल?"

पापभीरू माणसाच्या स्वभावाला अनुसरून अण्णा मूळ मुद्द्यालाच बगल देतात. "उगीच घाबरतेस तू ! काहीही होणार नाही तुला ह्या घरात ! तू आपलं गाणं म्हण बरं ! मी रेकॉर्ड करून ते प्रवासातही ऐकेन." आणि ती खरोखरच गाते.. अशा वेळी ती काय गाईल? तिच्या मनाची अवस्था कशी आहे?

कुठेतरी एक खोटा दिलासा तिला भूल घालतोय.. ह्या सगळ्या छळातून आपली खरंच कायमची सुटका होणार आहे.. एक नवं, कसलाही ताण नसलेलं मुक्त आयुष्य आपल्याला लाभणार आहे.. पण त्याच वेळी; पाण्यातल्या अदृश्य सुसरीसारखी एक अनामिक भयाची थंडगार चाहूलही तिच्या उरात खोलवर दडलेली आहे. तरीही ती भीती आत दडपून ती ते मुक्ततेचं स्वप्‍न नजरेपुढे आणील आणि उसनं बळ गोळा करून गाणं गाईल. मग ह्या अवस्थेत गायलेल्या तिच्या गाण्याचे शब्द काय असतील?

'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..'

बाबुजींनीही पाहतापाहता हे शब्द फार मधुर मधुरतम स्वरांत गुंफून टाकले. 'वॉल्ट्झ'ची तरंगती लय त्या शब्दांची स्वप्‍नील प्रसन्‍नता कितीतरी पटीने वृद्धिंगत करत होती. स्वरांचे वेगवेगळे रचनाबंध बाबूजी करून पाहत होते आणि पुन्हा पुसून टाकत होते. हे असं चालू असताना मध्येच त्यांच्या हातून एक वेधक स्वरावली उमटली. व्हायोलीनवर 'बो' फिरवून निघावी तशी बारीकबारीक मिंडकाम केलेली. मी विचारलं, "बाबूजी, ह्या पीसनंतरच्या कडव्याची चाल कशी?" ह्या माझ्या प्रश्‍नावर निरागस विस्मयाने बाबूजी बोलते झाले, "खरं म्हणजे ही कडव्याचीच पहिली ओळ केली आहे मी." मला तर त्या वळणावळणांनी जाणार्‍या लांबलचक स्वरावलीत कुठे अक्षरांची जागाच प्रथमदर्शनी दिसत नव्हती.

तरीही मी पुढची ओघानेच येणारी प्रश्‍नावली सादर केली.. "अच्छा ! ही कडव्याचीच पहिली ओळ ना? पण मग अशा ओळी किती? त्यांची वजनं तीच की पुन्हा बदलणार? आणि कडवं संपताना पुन्हा मुखड्याशी मिळणीची ओळ कशी असेल?"

"कुणास ठाऊक ! ही एक ओळ लिहा. मग पुढचा विचार करू." बाबूजी सहजपणे म्हणाले.
खरोखरच 'पावलापुरता प्रकाश' हे तत्त्व अनुभवत आणि इंच इंच लढवू म्हणत गाणं आकार घेत गेलं.

परिवर्तनाच्या कुठल्याही वळणावर असलेल्या कुणाही स्त्रीपुरुष व्यक्तीला हे आपलं मनोगत वाटलं तर त्यात कसलंही नवल वाटायला नको.
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.