A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पंढरपुरीचा निळा

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठा देखियेला डोळां बाईये वो ॥१॥

वेधलें वो मन तयाचिया गुणीं ।
क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥२॥

पौर्णिमिचें चांदिणें क्षणाक्षणां होय उणें ।
तैसें माझें जिणें एका विठ्ठलेंवीण ॥३॥

बाप रखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें ।
चित्त चैतन्य मुरे बांईये वो ॥४॥
भावार्थ-

परमेश्वराशिवाय क्षणभर राहू न शकणार्‍या भक्ताची मन:स्थिती प्रियकराभोवती सतत रुंजी घालणार्‍या स्त्रीमनामधून येथे प्रकट होते. पौर्णिमेनंतर चांदण्याचा जसा क्षणाक्षणाने क्षय होतो तसेच श्रीविठ्ठलावाचून आपले जीवन संपून जाईल असे भक्ताला वाटते. कारण विठ्ठलाचे निळे रूपच तसे वेधून घेणारे आहे. त्याने आपले सगळे चैतन्यच हरण केले आहे. म्हणून त्याला आपण क्षणभरही विसंबू शकत नाही.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.