A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक झोका चुके काळजाचा

एक झोका,
चुके काळजाचा ठोका,
एक झोका

उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका

नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका
गीत - सुधीर मोघे
संगीत - आनंद मोडक
स्वर- आशा भोसले
चित्रपट - चौकट राजा
गीत प्रकार - चित्रगीत
सुधीर मोघे - आदरांजली
१६ मार्च २०१४

शनिवारी दुपारी 'आठवणीतली गाणी'चा एक आधार तुटला.
कधीही, कुठेही, काहीही अडलं की तुमच्याकडे धाव घ्यायची.. ईमेल / फोन / प्रत्यक्ष.. असा जमेल तसा संपर्क साधायचा.. तुमच्या भोज्याला हात लावायचा आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे अशी एक सवयच लागली होती.

आपला शेवटचा संपर्क आणि चर्चा ८ जानेवारीची.
विषय होता, 'आठवणीतली गाणी'वर अप्रचलित शब्दांचे अर्थ देण्याची केलेली सुरुवात आणि 'साद देती हिमशिखरे' मधिल 'ध्वजा कौपिनाची'वर माझे अडकणे. कौपिनेश्वर म्हणजे शंकर, 'कौपिनं' या संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ..
तेंव्हा तुम्ही केलेल्या ईमेलचा काही भाग जसाच्या तसा..
".. मात्र ह्या विशष्ट गाण्याच्या संदर्भात हे इतर व्याकरणसिद्ध अर्थ उपयोगी नाहीत असं मला वाटतं. वसंत कानेटकर ह्यांचं हे पद त्यांच्या मत्स्यगंधा नाटकातील आहे, हा संदर्भ तुला ठाउक आहेच. पण तो प्रसंग ध्यानी घेतला तर त्या शब्दाचा मी जो लावला आहे तो अर्थ अधिक संयुक्तिक वाटेल असं मला वाटतं. मत्स्यगंधेच्या मोहात काही काल गुरफटलेला पराशर भानावर येउन तिचा निरोप घेतो आहे आणि त्याचं ह्या प्रवासाचं मूळ उद्दिष्ट तो तिला सांगतो आहे.
'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची..' पुढच्या ओळी ह्या दृष्टीने अधिक बोलक्या आहेत.
कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची.. अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची.. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची.. हे रूपक ध्यानी घेतले तर देवळाचा कळस आणि त्यावरचा (संन्यस्त वृत्तीचा निदर्शक भगवा ध्वज हाच अर्थ कवीच्या मनांत असावा असं वाटतं.."

अशी अनेकवेळा तुमच्याकडे घेतलेली धाव.. आणि काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणार्‍यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वृत्तीने आपण वेळोवेळी केलेले मार्गदर्शन..
वानगी दाखल सांगायचे झाले तर..

सुरेश भट यांच्या 'रंगुनी रंगात सार्‍या' या आपण संगीत दिलेल्या गझलेतील एक अंतरा 'भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो.. अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा' हा त्या गझलेच्या पुस्तकीय आवृत्तीत कसा नाही?
आणि 'कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे.. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा' हे त्याच्या ऐवजी आलं की कसं?

'ते मीनकेतनाचे ग मोडिले धनु मी ! त्या चित्त-चोरट्याला का आपुले म्हणू मी?'
'मीनकेतन' या शब्दाची व्युत्पत्ती कशी असेल? 'मीनकेतन' म्हणजे मदन. पण 'मीन' म्हणजे मासा आणि 'केतन' म्हणजे ध्वज. मग मदनाचा असा काही ध्वज असून त्यावर मासा, असं आहे का?

'मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका' आणि 'रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला' या दोन्ही गाण्यांना वसंत पवारांनी दिलेली एकच चाल.. का वाटलं असेल एका संगीतकाराला काही वर्षांच्या अवधीनंतर तीच चाल पुन्हा वापरावी?

'आला आला वारा'तल्या आपल्याला अभिप्रेत असलेल्या, सासरी निघालेल्या सया कोण? असं बरंच काही..

सुधीरजी..
तुम्हाला 'सर' म्हंटलेलं आवडायचं नाही म्हणून तुमचं वय, ज्ञान, अनुभव यामुळे आपसूक येणार्‍या 'सर'ला आवर घालत 'सुधीरजी' म्हणायला शिकले होते..

तुमच्या 'मुक्तछंद' बंगल्याच्या वरच्या खोलीच्या दोन भिंती, तुम्ही काढलेल्या चित्रांनी नटलेल्या असायच्या. त्या खोलीतून बाहेर पडताना तिथे थबकायचे.. मनभरून ती चित्र पहायची..
मग तुम्ही सांगायचे, "तुला माहित आहे नं, यातील कुठलीही आणि कितीही चित्र तू कधीही घेऊन जाऊ शकतेस.."
आणि मी म्हणायचे, "हा वर मी राखून ठेवत आहे." असा आपला एक रिवाज होता.
पण खरं तर असं कधीही वाटलं नाही की त्या सुंदर मांडणीतल्या एका कुणाला उचलून वेगळं करावं आणि 'एकलकोंडं' असं आपल्या घरात लावावं..*
जितकी नैसर्गिक त्या चित्रांची ती जागा होती तितकंच माझं तिथे दर वेळेस थबकणंही..

'मुक्तछंद' या आपल्या बंगल्याच्या ठिकाणी आता फ्लॅट सिस्टिम होणार हे सांगितलंत तेंव्हा मी म्हंटलेलं.. 'मुक्तछंद' आता साचेबद्ध होणार..
तर म्हणाला होतात, "वास्तू साचेबद्ध होतीये खरी.. आतला माणूस सदैव मुक्तच होता आणि राहील……………. !!"

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.