A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर दूर चांदण्यात मी असाच

दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो !
तारकांस हालचाल मी तुझी विचारतो !

वाटते कधी चुकून
भेटशील तू अजून
थांबतो पुन्हा मधून
अन्‌ उगीच सावल्यांत सैरभैर पाहतो !

चाललो असेच गात
ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे नभात
अन्‌ इथे फुलाफुलांत मी तुलाच शोधतो !

वेड लागले जिवास
हे तुझे दिशांत भास
हा तुझा मनी सुवास
आपल्याच आसवांत मी वसंत ढाळतो !
एक दिवस एच.एम.व्ही.मध्ये मी व सुरेश भट बसलो होतो. सुरेश भट खूप खुशीत होते. आमच्या गप्पा चालल्या होत्या. पण काय असतं की कलाकार एकमेकांना जोखण्याचा प्रयत्‍न करीत असतात. कवीला संगीतकार जोखत असतो की याच्याकडे चांगल्या चांगल्या शब्दांचा व कल्पनांचा किती स्टॉक आहे. त्याचप्रमाणे कवीही विचार करीत असतो की या संगीतकाराकडे स्वरांचे व चालींचं किती भांडार आहे. त्यांना मी म्हंटलं, तुमच्याकडे असलेल्या काही कविता माझ्याकडे द्या त्यांना मी चाली लावून रेकॉर्ड करीन. सुरेश भट म्हणजे एकदम लाजवाब कवी. लगेच त्यांनी दोनचार कविता ऐकवल्याच व मग मिस्किलपणे मला म्हणाले, "मला एक नवीन काव्य सुचतंय्‌. बघू कसं जमतंय ते. मी एक मुखडा ऐकवतो. त्याला तुम्ही चालीत म्हणून दाखवा." एका दृष्टीने ते माझी परीक्षाच घेत होते. त्यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात एका गीताचा मुखडा ऐकवला-
दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो
तारकांस हालचाल मी तुझी विचारतो

मला म्हणाले, "तुम्ही कशी चाल लावणार याला सांगा पाहू !"
आम्ही एच.एम.व्ही.त बसलो होतो. समोरच हार्मोनियम होती, ती जवळ ओढली. तिथल्या तिथं मी त्यांना चाल ऐकवली व त्यांनाही चाल आवडली. म्हणाले, "वा ! वा ! तुमचा पण जवाब नाही." मी म्हंटलं, "तुमचं लाजवाब असलं की त्याला जवाब मिळणारच. पण थांबा ! मी तुम्हाला या गाण्याचा आणखी एका चालीचा मुखडा ऐकवतो. सांगा, कसा काय वाटतोय तो." मग मी त्यांना निराळ्याच चालीत ते गाणं गाऊन दाखवलं. ते पण खूष. मी पण खूष.

त्यावेळीच काय पण नंतरही बरीच वर्षे ती चाल व ते गाणं रेकॉर्ड झालं नाही. साधारणत: १९९० साली रेकॉर्ड झालं तेही अरुण दाते यांच्या आवाजात. अरुण दाते हे सध्या उत्तम गायक म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. पण योग असा की ४० वर्षांपूर्वी ऐकवलेलं काव्य व चाल रेकॉर्ड व्हायला ४० वर्षे वाट पाहावी लागली. याचाच अर्थ एखाद्या गाण्याचं भाग्य केव्हा उदयाला येईल ते आपण सांगू शकत नाही. असंही वाटतं की, चांगली चाल सुचणं याला चांगला दिवस, नक्षत्र चांगले असावे लागते व अशा चांगल्या मुहूर्तावर सुचलेल्या चालीचं भविष्य चांगलं असतं. नाही तर तुम्ही कितीही प्रयत्‍न करा चांगली चाल जमणार नाही अन्‌ जमलीच तरी ते गाणं वहीमध्येच पडून राहील.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.