A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर आर्त सांग कुणी छेडली

दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

एकाकीपण सरले
मी माझी नच उरले
भान असे हरले अन्‌ मी झाले बावरी

यमुनेचे हे पाणी
चकित होय मजवाणी
कानांनी प्राणांनी प्राशियली माधुरी

कुठुनी हे येति सूर?
लावितात मज हुरहुर
तडफडतो फडफडतो प्राणविहग पंजरी

मी मजला विसरावे
बुडुनि सुरांतच जावे
बासरी न दूर सखे, ती माझ्या अंतरी