A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बर्फ पेटला हिमालयाला

बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला
फक्त रक्त द्या, वृद्ध तरुण या
द्या रे साद हाकेला
या रे, द्या रे साद हाकेला

घडू नये ते आजला घडते
स्वातंत्र्याचे बाळ रांगते
स्वतंत्र विहरावया धावते
बंधू चिनी सुरा घेउनी काळ ‍होउनी आला

रक्तकलश हिमगीरीवर चढू द्या
जनसागर सीमेला भिडू द्या
शिरकमळे अग्‍नीत पडू द्या
ध्वज राष्ट्राचा सीमेवरचा भिडू द्या रे गगनाला

पक्ष, पंथ, धर्म, भेद सारुनी
गिळली भूमी मुक्त करोनी
गान शांतीचे घुमवू गगनी
न्यायी भारत, नाही आक्रमक दावू या जगताला