A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिव्यत्वाची जेथ प्रतीती

दिव्यत्वाची जेथ प्रतीती
तेथें कर माझे जुळती.

गाळुनियां भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरी येउनियां जाती
जग ज्यांची न करी गणती-
तेथें कर माझे जुळती.

यज्ञीं ज्यांनी देउनि निजशिर
घडिलें मानवतेचें मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा नाहीं पणती-
तेथें कर माझे जुळती.

जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती.

मध्यरात्रिं नभघुमटाखालीं
शांति शिरीं तम चंवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं
एकान्‍तीं डोळे भरती-
तेथें कर माझे जुळती.