A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिसं जातील दिसं येतील

तुज्यामाज्या संसाराला आणि काय हवं
तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पाणी?
राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ

ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जिवाचा त्यो आरसा असंल

उडुनिया जाईल ही आसवांची रात
आपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव