A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धुंद येथ मी स्वैर झोकितो

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याच वेळी तू असशिल तेथे बाळा पाजविले

येथ विजेचे दिवे फेकती उघड्यावर पाप
ज्योत पणतीची असेल उजळित तव मुख निष्पाप

माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी
ओठांवरती असेल तुझिया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशिल शोधित सखे, स्वप्‍नसृष्टी

कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप?
शीलवती तू पतिव्रते मी मूर्तिमंत पाप !