A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चरणिं तुझिया मज देईं

चरणिं तुझिया मज देईं, वास हरी

चरणतळीं तव कमल विराजे,
तेंच करीं मज देवा, कल्पवरी.
कुणा संतती, कुणा राज्य दे,
मजला हरिचे देई रे, चरण परि.

कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे,
मजला परि चरणाचा, दास करीं.
मी घालीं ना संकट तुजवरि,
केवळ मज चरणाचे, रजच करीं.

चिकटुनि राहिन सदा पदांला,
इतुकी मम पुरवावी रे, आस परि.
मिरवीन वैभव हें त्रैलोक्यीं
येइल तरि नृपतीला, काय सरी?
गीत - भा. रा. तांबे
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- माणिक वर्मा
गीत प्रकार - भक्तीगीत
  
टीप -
• काव्य रचना- ४ जानेवारी १९२८, ग्वाल्हेर.
कल्प - ब्रह्मदेवाचा एक अहोरात्र दिवस, चार अब्ज बत्तीस कोटी सौर वर्षे.
नृपति - राजा.
रज - धूळ.
सर - बरोबरी, तुलना.
नोंद
कवीचा ईश्वरावरचा विश्वास व त्याची भक्ती हे गीत व्यक्त करते.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.