A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांदणं टिपूर हलतो वारा

चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा
त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा !

डावी पापणी फुरफुर करी
नवसाला अंबाबाई पावली खरी
अवचित सजणा आला घरी
मनच्या खुशीत की मजला कुशीत घ्या दिलदारा !

पंचकल्याणी घोड्यावरून
दौडत आलो सये दुरुन
रूप घेऊ दे डोळा भरून
तुजला बघून ग जाईल निघून हा थकवा सारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा !

शालूच्या पदरानं पुसते हो पाय
खायाला देते मी साखरसाय
आणखीन सेवा करू मी काय?
पडते गळा की लावते लळा की द्या आधारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा !

नेसुन चांदणं आलीस अशी
पुनव देखणी झुकलिस जशी
डाव्या हाताची घे ग उशी
चांदणं मिठित की चांदणं दिठित झिमझिम धारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा !