A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चला सख्यांनो हलक्या हाते

चला सख्यांनो, हलक्या हाते नखानखांवर रंग भरा
ग, नखांनखांवर रंग भरा !

आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग
पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहूल ग
सिंहकटीवर स्वैर खेळु द्या रत्‍नमेखला सैल जरा !

बाहूंवरती बांधा बाई बाहुभूषणे नागाची
अंचली झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
गळ्यात घाला हार साजिरा, पदकी त्याच्या दिव्य हिरा !

वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग
आकाशातील नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग
सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा !