A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बुगडी माझी सांडली ग

बुगडी माझी सांडली ग जाता सातार्‍याला
चुगली नगा सांगू ग माझ्या म्हातार्‍याला

माझ्या शेजारी तरुण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्‍याला

आज अचानक घरी तो आला
पैरण फेटा नि पाठीस शेमला
फार गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजार्‍याला

घरात नव्हते तेव्हा बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा !
वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखार्‍याला

त्याने आणली अपुली गाडी
तयार जुंपून खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला

येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाऊन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई, त्याला बिचार्‍याला