भावना भंगोनि जातां जीव मेला या जगाला
मोहमाया-पाश सारे तोडिले भवबंध सारे
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | शंकरराव सरनाईक |
स्वर | - | निर्मला जाधव |
नाटक | - | सौभाग्य-लक्ष्मी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
आता खुद्द नाटकासंबंधी मला कांहींच सांगावयाचे नाही पण एवढं मात्र सांगावेसे वाटते की या नाटकात रंगविलेली सर्वच पात्रे केवळ कपोलकल्पित नाहींत. 'भीमा मावशी', 'नरेंद्र', 'शामसुंदर', 'विमल', 'सरोजिनी' वगैरे पात्र कल्पनासृष्टीतील भासण्याचा बराच संभव असला तरी वस्तुस्थिति तशी नसून ही पात्रे या महाराष्ट्रांत, सत्यसृष्टीत अद्यापीही नांदत आहेत. अर्थातच निराळ्या नावाखालीं !
'सौभाग्य-लक्ष्मी'ला जन्म देऊन मला जवळ जवळ दीड वर्ष होत आले; परंतु तशाच काहीं अनेक अकल्पित अडचणीमुळे, जाहिराती जगात ती तत्काळ नांदू लागली तरी रंगभूमीवर अवतीर्ण होण्याचा योग तिला लौकर लाभला नाहीं.
अस्तु. आता उरले आभार-प्रकरण ! पण केवळ सांप्रदायिक शिष्टाचारानुरूप शाब्दिक आभार प्रदर्शनाचे अवडंबर नव्हे तर अतःकरणांतून उसळलेल्या उत्कट भावनांचा उमाळा व्यक्त करण्याला, माझी कृतज्ञताच मला भाग पाडीत आहे.
माझ्या विनंतीला मान देऊन विख्यात, विद्वान् वाग्भट प्रिन्सिपाल गो. चि. भाटे, एम. ए. यांनी आपल्या नित्याच्या प्रेमळ, उदार बुद्धीनि प्रस्तावना लिहून मला अखंड ऋणाईत करून ठेविले आहे. त्यांचे आभार कोणत्या शब्दांत मानावेत, हेच समजत नाही.
स्वावलंबनाच्या पायावर उभे राहताना पडत्या काळातील परिस्थितीच्या फेर्यांत हेलकावे खाणार्या माझ्या हृदयाचा कलता तोल सांवरून, सक्रिय महानुभूतीने आणि प्रोत्साहनबुद्धीने रा. अनंतराव गद्रे (संपादक- मौज) यांनी मला धीर दिला नसतां तर ही कृति माझ्या हातून निर्माण झाली असती कीं नाहीं, हे सांगतां येत नाहीं. तेव्हां त्यांचाही मी अखंड उपकारबद्ध आहेच.
त्याचप्रमाणे माझ्या या पहिल्या प्रयत्नांत ज्यांनी मला महानुभूति दाखविली त्या माझ्या सर्व हितचिंतक परम मित्रांचा विशेषतः, महाराष्ट्राच्या परिचयाचे सुप्रसिद्ध कवि श्रीयुत 'काव्यविहारी', नरहर गणेश कमतनूरकर (सरस्वतीकुमार ), 'गिरीश', 'यशवंत', गो. गो. अधिकारी, यांचा मी अत्यंत आभारी आहे.
पुस्तकात प्रसंगानुसार श्री. 'काव्यविहारी' आणि 'गिरीश' यांच्या अनुक्रमे 'कृष्णाकांठी' आणि 'अभागी कमल' या काव्यांचा परवानगीवाचून उल्लेख केल्याबद्दल ते मला उदार मनाने क्षमा करतील, अशी आशा आहे.
माझ्या सौभाग्य-लक्ष्मीचा रंगभूमीवर अवतार म्हणजे 'यशवंत संगीत मंडळी'चे कर्तबगार डायरेक्टर महाराष्ट्र-कोकिळ श्री. शंकरराव सरनाईक यांच्या निर्व्याज बंधुप्रेमाचा, उत्साही मॅनेजर रा. नानासाहेब हर्डीकर आणि एजंट रा. श्रीपतराव उपरे यांच्या अकृत्रिम स्नेहभावाचा प्रत्यक्ष परिचय, असे म्हटले असता अतिशयोक्तीचा अपराध माझ्या पदरी पडणार नाहीं खास !
या नाटकाचा प्रथम प्रयोग शनिवार तारीख ११ एप्रिल १९२५ रोजी रात्रौ ९ ॥ वाजता 'यशवंत संगीत मंडळी'ने किर्लोस्कर थिएटर, पुणे, येथे केला.
शेवटी या सदोष नाट्यकृतीची साधी सेवा साजरी करून घेण्यासाठी समाज-सर्वेश्वराला पुनः एकवार अत्यंत नम्रपणे विनंती करून लेखणीला विराम देतो.
(संपादित)
सदाशिव अनंत शुक्ल
दि. १६ एप्रिल १९२५
'सौभाग्य-लक्ष्मी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- शंकर रामचंद्र सरनाईक (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.