A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भव्य हिमालय तुमचाअमुचा

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्‍न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक्‌ तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनी जनार्दन बघणारा तो 'एका' हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी, जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करु देत भले
माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तिची पेठ खुले

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगाने पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहू पसरुन अवघ्या विश्वाते कवळी
माझ्या घरची विशाल दारे, खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबड्या हृदयात
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात
कभिन्‍न - अतिशय.
कातळ - खडकाळ जमीन.
कांबळ - घोंगडी.
तृण - गवत.
थडी - तीर / कुळ / मर्यादा.
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
वाकळ - पांघरूण.
संपूर्ण कविता

भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्‍न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक्‌ तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनी जनार्दन बघणारा तो 'एका' हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करु देत भले
माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेमाझे भारत भारतवर्षाचे
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयात परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि हृदयामाजी
बच जायें तो और लढें
पाऊल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचे रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी राहील गाठी मरहट्याचा हट्ट खरा

तुमचे माझे ख्यालतराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन्‌ मुरली
थाप डफाची कडकडता परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरीदरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जाते
उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासशी दृढ नाते

कळे मला काळाचे पाऊल द्रुत वेगाने पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहू पसरुन अवघ्या विश्वाते कवळी
माझ्या घरची विशाल दारे खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयात
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  श्यामा चित्तार, शरद जांभेकर