A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भातुकलीच्या खेळामधली

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राजा वदला, "मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
"उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी

तिला विचारी राजा, "का हे जीव असे जोडावे?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?"
या प्रश्‍नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना?
वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी
Random song suggestion