A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितिक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली
तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले !
गीत - ना. धों. महानोर
संगीत - श्रीधर फडके
स्वर- श्रीधर फडके
गीत प्रकार - भावगीत
काचोळी - मागे बंद असलेली चोळी.
ज्वार - भरती (समुद्राच्या पाण्याची वाढ) / जोंधळा.
या माझ्या सुंदर अशा गूढ कवितेला श्रीधर फडके यांनी संगीतसाज चढवला आहे. श्रीधरने संगीतक्षेत्रात स्वत:चा चेहरा उभा केला आहे. त्यात बाबूजींची फार छाप उमटू दिली नाही. स्वत:चं नवं निर्माण करण्याची त्यांची धडपड होती. ते केलं.

तशी ही कविता खूप सांगत नाही. अंतर्‍याच्या ओळी, त्यातील रिकाम्या जागा रसिकांना त्या घटनेच्या अवस्थेपर्यंत घेऊन जातात. शिकवायला ही कविता कठीण. हलक्या शब्दांच्या संगीतातून श्रीधरने ती छान गायलेली आहे. बदलत्या क्षणांच्या स्वरात कवितेतल्या स्थित्यंतराचा भाव.
पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

पुढल्या ओळींमध्ये काय घडतं? 'काजळात चंद्र बुडून गेलेले'. एक गूढ प्रीतीचा, शारीर प्रीतीचा जुन्या आठवणींचा हलका गाज. प्रसन्‍न, पण नको ती आठवण.
बेसावधपणी शब्द गेला कधीकाळी
भरल्या संसारात आता नको रे किंकाळी

'वाटेच्या वाटसरा' या भा. रा. तांबेंच्या कवितेत पूर्वाश्रमीच्या प्रेमाची सुंदर गुंफण आहे. तीच कविता नव्या जाणिवा, शब्द व सूचकता हे जाणीवपूर्वक करून मी लिहिली.
काळाच्या ओघात कविता पुढे गेली पाहिजे आणि संगीत सुद्धा.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.