A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवघाचि संसार सुखाचा

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृताचें फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वराविष्कार- मधुवंती दांडेकर
गोहरबाई राजहंस
अरुण सरनाईक
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संत कान्होपात्रा
राग - धानी
ताल-भजनी धुमाळी
गीत प्रकार - नाट्यसंगीत, संतवाणी
  
टीप -
• स्वर- मधुवंती दांडेकर / गोहरबाई राजहंस, संगीत- मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन, नाटक- संत कान्होपात्रा.
• स्वर- अरुण सरनाईक, संगीत- राम कदम, चित्रपट- चंदनाची चोळी अंग अंग जाळी (१९७५).
क्षेम - आलिंगन, गळाभेट.
लाहणे - लाभणे, मिळणे.
संवसाटी - बरोबर / सारूप्य / साम्य.
भावार्थ-

आपला संसार इतरांसारखा नाही, तर तो व्यापक आहे. तिन्ही लोकांत भरून राहिलेला हा संसार आहे. असा हा संसार सुखाचा करायचा आहे. या संसारामध्ये आनंद भरून टाकावयचा आहे.

हा संसार सुखाचा करावयाचा तर या तिन्ही लोकांची निर्मिती करणार्‍या परमेश्वराला, पंढरपुरला जाऊन भेटले पाहिजे. ते माहेरच आहे सार्‍या सृष्टीचे. आणि सुकृतीचे फळ तिथे आईला (विठ्ठलाला) कडकडून भेटले की प्राप्त होते. एवढेच नाही, तर परमेश्वर आपल्यावर अशी प्रेमदृष्टी करतो की आपणही त्याच्यासरखेच होऊन जातो.

येथे 'सासर', 'माहेर', सासुरवाशिणीची 'माय' या नात्यांचा, या नात्यांमधील भावबंधाचा ज्ञानेश्वरांनी समर्पक वापर करून घेतला आहे. संसारातील नात्यांच्या आधारे विश्वव्यापकत्‍व सूचित केले आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मधुवंती दांडेकर
  गोहरबाई राजहंस
  अरुण सरनाईक