मना घेई हाचि छंद
नलगे धनसंपदा
शुद्ध बुद्धी देई सदा
नांदो जनांत आनंद
सत्य सदा समतानंद
समदृष्टी विश्व पहावे
दुसरा आपण होऊन जावे
जीव शिवाला भेटतो
तेथे होतो नामानंद
जन्ममरण याचि देही
सोसणारा दुजा नाही
सोसविता मेळवितो
दु:खामाजी नित्यानंद
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | यशवंत देव, राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
नाटक | - | अवघा आनंदी आनंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
'प्रस्तावना' काय लिहावी का लिहूच नये या द्विधा मनःस्थितीत असतानाच मी पेन उचललेलं आहे ! या नाटकाबद्दल बरंच काही आज तारखेपूर्वी वृत्तपत्रांतून लिहिलं गेलेलं आहे ! ज्यानं त्यानं स्वतःला जे वाटलं ते लिहिलं ! जसे मी स्वतःला वाटतं तसं नाटक लिहिलेलं आहे ! प्रत्येकजण स्वतःच्या विचारांचं समर्थन करायला मुक्त आहे, तशी मुक्तता आपणही घ्यायला हरकत नाही असं वाटलं, म्हणून हा प्रस्तावनेचा प्रपंच !
सर्व समीक्षकांचा रोख (अपवाद वगळता) या नाटकाला कथानक नाही फक्त संवाद आहेत, असा आहे ! 'चांगले' असं मी म्हणत नाही; कारण ते त्यांनी म्हटलं आहे ! माझा प्रश्न असा की, कथाच नसेल तर संवाददेखील कुठून? असो ! आज प्रायोगिक रंगभूमीवर वेगळे वेगळे प्रयोग करून पाहिले जात आहेत ! व्यवसाय हा प्रयोगापासून लांब का असावा?, असं मला सदैव वाटत आलं आहे; म्हणून पूर्वीपासून (आकाशगंगेपासून) वेगवेगळे प्रयोग मी करत आलो आहे ! हे नाटक त्यातलाच एक प्रकार आहे, हे प्रथम नम्रपणे नमूद करून ठेवतो ! आता व्यवसायात प्रयोगांना यश मिळत नसतं ती प्रथा या प्रयोगापुरती खोटी ठरली ह्याचे धनी प्रेक्षक ! त्यांचा मी आभारी आहे !
१९४६ सालापासून मी रंगभूमीवर नाटकं लिहीत आलो आहे ! प्रयोग करीत आलो आहे ! तेव्हा थोडंसं या विषयात आपल्याला समजू लागलं असा अहंकार मला आला असेल, तर त्याबद्दल क्षमा तरी का मागावी? कारण अहंकार हा कधीच क्षमाप्रार्थी नसतो ! (एक चांगला संवाद कथा नसलेल्या प्रस्तावनेसाठी लिहिलेला.) ऊर्ध्वं मूलं अधः शाखां अश्वत्थं प्राहुरव्ययं असं विश्वरूपाचं वर्णन गीतेमध्ये बहुतेकांनी वाचलंच असेल ! तसाच विचार हे नाटक लिहिण्यापूर्वी माझ्या मनात येऊन गेला. म्हणून या नाटकाच्या सुरुवातीपासून प्रत्येक समस्या सोडवत सोडवत शेवटी मी गाठ मारून ठेवली आहे. म्हणजे फांद्या खाली आणि मूळ वरती असा या नाटकाचा प्रकार आहे.
एका लिफ्टमध्ये चार-पाच एकमेकांचे कट्टर शत्रू उभे असताना मध्येच वीजप्रवाह खंडित होऊन बराच काळ लिफ्ट थांबते आणि पुन्हा कधीच सुरू होणार नाही अशी शंका आल्यामुळे ते सर्व प्रवासी एकमेकांचे वैर विसरून गाढ स्नेही होतात. आणि काही काळाने पुन्हा लिफ्ट सुरू झाल्याबरोबर पुन्हा एकदा एकमेकांचे कट्टर वैरी बनून बाहेरच्या जगात प्रवेश करतात. ही कथा ज्यांनी वाचली असेल (अर्थात ही कथा असली तर !) त्यांना या नाटकात कथानक नाही, असं म्हणावंसं वाटलं तर मुळातच हा विचारातला मतभेद ठरेल. जन्म, लग्न आणि मृत्यू ह्या तीनच विषयांवर आयुष्याच्या नाटकाचं कथानक घडत असतं. आता आयुष्यालाच कथानक नाही, असं जर म्हणायचं असलं तर या नाटकाला कथनाक नाही हे आपल्याला एकदम मान्य !
माणसाचा मृत्यू हे एक विनोदाला उत्तम माध्यम आहे असं कै. आचार्य अत्रे मागं एका व्याख्यानात म्हणाले होते; त्याचा मी सूत्र म्हणून या नाटकात उपयोग केलेला आहे ! उदा. दुसर्या अंकाच्या शेवटी एका व्यक्तीचा मृत्यू दाखवून तिसर्या अंकाच्या सुरुवातीला तो प्रेक्षकांना जिवंत दाखवून नंतर त्याच्या घरची रडारड प्रेक्षकांना भरपूर हसवू शकते हा प्रयोग या नाटकाच्या निमित्तानं मी सिद्ध केलेला आहे.
व्यावसायिक रंगभूमी ही प्रेक्षकांचं रंजन करण्यासाठी राबवली जात असते; किंबहुना जावी असं मानणार्यांपैकी मी एक आहे. तान्ह्या मुलाच्या निरागस वृत्तीनं तिकिटं काढून येणारा प्रेक्षक नाटकाला येत असतो, अशी माझी एक भोळी समजूत आहे. तान्हं मूल जसं वेगळे वेगळे रंग डोळ्यांपुढं आणि वेगळे वेगळे ध्वनी कानावर आल्यानंतर आनंदानं खिदळत असतं तोच प्रेक्षकांच्या बाबतीत मला आजपर्यंत आलेला अनुभव आहे. बीभत्स, अश्लील वा असम्य असं काही तरी लोकांना दाखवून त्यांच्या भावना चाळवण्यापेक्षा आयुष्यात येणार्या चांगल्या वा गोड अनुभवांची जंत्री प्रेक्षकांच्यापुढे ठेवून त्यांचं मनोरंजन करणं इतक्यापुरताच माझा अभ्यास मर्यादित असल्यामुळे परीक्षकांच्या काटेरी विधानांचा अर्थच मला कळत नाही. हा माझ्या दृष्टीने माझ्या समाधानाचा भाग. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते हे असं ! तेव्हा त्यांचा राग येण्याइतकी बुद्धीच मला परमेश्वराने दिली नाही याबद्दल परमेश्वराचे आभार मानले म्हणजे समीक्षकांचे वेगळे मानायला नकोत.
एक प्रश्न मात्र माझ्या डोळ्यांसमोर या परीक्षणाबद्दल नेहमी तरळत असतो; की रंगभूमी किंवा नाटक हा साहित्यातला एक श्रेष्ठ प्रकार आहे असं आवर्जून सांगणार्या आजच्या जमान्यात नाटकांची परीक्षणं पूर्वीप्रमाणे वृत्तपत्रांचे संपादक आपल्या अग्रलेखातून का करीत नाहीत?- जसं पूर्वी अच्युतराव कोल्हटकर वा काकासाहेब खाडिलकर करीत असत. का सध्याची रंगभूमी ही एखादी बातमी देण्याइतपतच योग्यतेची आहे असा त्यांचा विश्वास असून जशी आम्ही फक्त नाटकाची जाहिरात करतो तशीच मराठी रंगभूमी ही एक श्रेष्ठ कला आहे असा एक नाममात्र आभासाचा फुगाच फक्त समाज-आकाशात तरंगत ठेवण्यात आला आहे? असो.
(संपादित)
बाळ कोल्हटकर
'अवघा आनंदी आनंद' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.