असे हे जगाचे फिरे
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
हिवाळ्यात थंडी करी जीव वेडा
नुरे पान झाडा, न शोभा पहाडा
भरे गारवा, वाजती दात-दाढा
बसो वाटते लावुनीया कवाडा
नको वाटतो खेळ-अभ्यास-शाळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
उन्हाळ्यात येतो नव्याने उबारा
फुले डोलती बाग येती बहारा
जरी आतपे, ताप होतो दुपारा
फिरे सौरभा घेउनी मंद वारा
तिन्हीसांज घे रंग काही निराळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
पुढे पावसाळा नभी मेघ-माळा
दर्या-डोंगरांना निळा ये उमाळा
हराळीवरी वाजती सौख्य-वाळा
वरी कोसळे अंबराचा जिव्हाळा
दुजा स्वर्ग ऐसे दिसे विश्व डोळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
हिवाळ्यात थंडी करी जीव वेडा
नुरे पान झाडा, न शोभा पहाडा
भरे गारवा, वाजती दात-दाढा
बसो वाटते लावुनीया कवाडा
नको वाटतो खेळ-अभ्यास-शाळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
उन्हाळ्यात येतो नव्याने उबारा
फुले डोलती बाग येती बहारा
जरी आतपे, ताप होतो दुपारा
फिरे सौरभा घेउनी मंद वारा
तिन्हीसांज घे रंग काही निराळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
पुढे पावसाळा नभी मेघ-माळा
दर्या-डोंगरांना निळा ये उमाळा
हराळीवरी वाजती सौख्य-वाळा
वरी कोसळे अंबराचा जिव्हाळा
दुजा स्वर्ग ऐसे दिसे विश्व डोळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | नंदिनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, बालगीत |
आतप | - | ऊन्ह. |
कवाड | - | दरवाजाची फळी, दरवाजा. |
तिनिसांज | - | सांजवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हिसांजा, कातरवेळ हे सर्व शब्द 'संध्याकाळ' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सांजवणे, सांजावणे, सांजळणे म्हणजे संध्याकाळ होणे. |
सौरभ | - | सुगंध / कीर्ती. |
हरळी | - | आरोळी, मोठ्याने मारलेली हाक / एक प्रकारचे गवत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.